आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न.पा. महापालिकेत रूपांतर होण्याच्या हालचाली:16 डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करा ; सीओ

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका शाळांची स्थिती, आरोग्य सुविधा, मालमत्ता तपशील, उत्पन्नाचे स्रोत, शहराबाहेरील मालमत्ता, अनुदान आदी विषयांशी संबंधित माहिती नगरपालिका प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांकडून मागवली आहे. ही माहिती १६ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिले आहेत. जालना नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होण्याविषयीच्या हालचालींना वेग आला आहे. शासनाने जिल्हा प्रशासनाकडे मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने माहिती संकलित करून तसा प्रस्ताव करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

जालना पालिकेच्या दवाखान्यातील आरोग्याच्या सोयीसुविधा, आरोग्य केंद्रांची संख्या, लसीकरण, सर्व स्रोतांपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न, मागील तीन वर्षांत शासनाकडून प्राप्त निधी, सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार जमाखर्चाची आकडेवारी, शहर विकास योजनेचा मंजूर आराखडा, एकूण आरक्षणे, शहराचे एकूण क्षेत्रफळ, शहराची भौगोलिक परिस्थिती, हद्दवाढ केव्हा झाली त्याची माहिती, शहरातील झालेले व प्रस्तावित प्रकल्प, भविष्यात संभाव्य महापालिकेसाठी हद्दवाढ करावी किंवा कसे याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल, शहरातील दळणवळणासाठी असलेले रस्ते, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते व इतर रस्त्यांची लांबी, मागील पाच वर्षात उभारलेल्या प्रकल्पांची व प्रस्तावित प्रकल्पांची माहिती, पाइपलाइन, अंतर्गत वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, पाणीपुरवठा स्रोत, शहरातील स्वच्छताविषयक कामे, ओडीएफ, ओडीएफ प्लस, कचरा संकलन, स्वच्छता आराखडा, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेली कामे, विद्युत विभागांतर्गत मागील पाच वर्षांत करण्यात आलेली कामे, नगर परिषद मालकीच्या मालमत्ता, शॉपिंग कॉम्प्लेक्स, खुल्या जागा, विविध मक्त्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नाची मागील पाच वर्षांतील परिस्थिती, अग्निशमन दलासाठी उपलब्ध साधनसामग्री, इमारत आदींची माहिती, पालिकेच्या शाळा, विद्यार्थी संख्या या माहितीचा समावेश आहे.

पालिकेकडून जिल्हा प्रशासनाला अहवाल
भविष्यात शाळेसाठी कोणत्या सुविधा असणार, याविषयीची माहिती, शहरातील इमारती, वेळोवेळी करण्यात आलेली कर आकारणी आदी माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती संकलित करून सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व विभागांची माहिती आल्यानंतर एकंदरीत अहवाल पालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...