आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अचानक झालेल्या मुसळधार पाऊस; पांगरा गडदेचा पाझर तलाव फुटून नुकसान

मंठाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पांगरा गडदे येथील पाझर तलाव फुटून शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीबाबतचा पंचनामा केला आहे. १९९७ साली पूर्ण झालेल्या पांगरा गडदे येथील पाझर तलावाला मागील दोन वर्षापासून धोका निर्माण झाला होता.

तलावाच्या मुख्य भिंतीला मोठ-मोठी छिद्रे पडल्याचे गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत संबंधितांना वेळोवेळी लेखी निवेदन देखील दिली होती. परंतू पाटबंधारे विभागाच्या वतीने ही बाब फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही. याबाबत थातूरमातूर डागडुजी करून वेळ मारून नेण्याचे काम झाले, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे गावकरी सांगत आहेत. शुक्रवारी दुपारनंतर अचानक तासभरापेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलावात पाणी साचून तलावाची मुख्य भिंत फुटली.

यामुळे १००ते १५० एकर शेत जमिनीचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्यावतीने तलाठी डी. आर. गाढवे यांनी सांगितले. मात्र शेतीचे नुकसान यापेक्षा जास्त असल्याचे गावकरी गणेश विधाते यांनी सांगितले. अनेक शेतकर्‍यांनी पेरणी देखील केली असल्यामुळे त्यांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे. याबाबत तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.