आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:खरिपातील नुकसान सहन करत रब्बी हंगामासाठी शेतकरी लागले कामाला

प्रल्हाद लोणकर | जाफराबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुणराजाच्या लहरीपणामुळे नष्ट झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची आशा उराशी बाळगून जाफाराबाद तालुक्यातील शेतकरी आता रब्बीकडे वळला आहे. परिसरात शेतीच्या कामांना सुरुवात झाली असून शेतकरी काळ्या आईच्या मशागतीच्या व्यग्र झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा आल्याने मशागतीच्या अडचणी येत असूनदेखील घरधन्याच्या मदतीसाठी संपूर्ण परिवार शेतात उतरला असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. यावर्षी एकूण १३ हजार १४० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जोरदार परतीच्या पावसानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे जाफराबाद तालुक्यात शेतीचे आतोनात नुकसान झाले. ऐन कापणीला आलेले पीक डोळ्यांदेखत मातीमोल झाले. पै-पै जोडून जमवलेले पैसे खरिपाच्या पेरणीत गुंतवल्यानंतर हातात काहीच न आल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. मका, कापूस, उडीद मूग सोयाबीन सगळंच हातातून निसटलं आहे. शासनाकडून नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांकडून मागण्या जोर धरून लागल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मदतनिधी जाहीर केला. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ती शासकीय मद्त कधी पदरी पडेल कि रद्द केल्या जाईल याची शाश्वती नाही.मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असतांना आता समोर रब्बी पेरणी उभी ठाकली आहे. त्यामुळे मागचे सगळे विसरून शेतकरी आता रब्बीच्या पेरणीच्या कामात गुंतला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यावेळी जास्तीच्या पावसाचा फटका बसला आहे. ओल्या दुष्काळामुळे तो पुरता खचला आहे. दरम्यान, सर्व दुःख विसरून शेतकरी आता नव्या जोमाने, नव्या उमेदीने रब्बीच्या पेरणीत गुंतला आहे. सततच्या पावसामुळे शेतजमीन ओलाव्याखाली आली आहे. त्यामुळे शेतामधील ओलावा व चिखल मोठ्या प्रमाणात अद्यापही तसाच आहे.

अशावेळी मशागत करताना शेतकऱ्यांना अडचण होत आहे. चिखल वाळविण्याची प्रतीक्षा केल्यास पेरण्यांमध्ये उशीर होऊन हंगाम हातातून निघून जाण्याचा धोका आहे. पावसामुळे आधीच रब्बीला उशीर झाला आहे. अशात आणखी उशीर झाल्यास ते शेतकऱ्यांना परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे आहे त्याच परिस्थितीत शेतकरी जमेल तशी मशागत करण्यात व्यस्त आहे. पाऊस कमी झालेल्या परिसरात पेरणी अटोपती झाली आहे.

पाण्याचा प्रश्न मिटला
शेतीसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. दरवर्षी तालुक्यात पाणीटंचाई असल्याने शेतीसिंचनात मोठी अडचण येत होती.तालुक्यातील पाणीसाठे कोरडेठाक पडल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. परिसरातील पूर्णा, केळणा,धामना या नद्या व जिवरेखा मध्यमप्रकल्पा सहित लहान-मोठे तलाव विहिरी, धरणे हे सर्व जलस्रोत तळाला गेले होते तरीदेखील बळीराजाने जिवाचे रान करून पिके जगवली. परंतु, निसर्गाने तेही ओरबाडून घेतल्याने तो अडचणीत आला. यंदा मात्र भरपूर पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे तुडुंब भरले असून भूजल पातळीत यंदा लक्षणीय वाढ झालेली आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आशा
खरिपात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आस लावून आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नाहीत, तर अनेक गावांमध्ये अतिवृष्टी मदतीच्या नुसत्याच याद्या लावण्यात आल्या आहेत. रोख रक्कम मात्र अद्याप मिळालेली नाही. मदतनिधी पदरी पडेपर्यंत उधारीवर, कर्ज काढून, नातेवाइकांकडून उसनवारी करून पैसा उभा करून शेतकऱ्यांनी रब्बीच्या कामांना सुरुवात केली आहे. यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी अशा बाळगून शेतकऱ्यांनी शेतीची रब्बीची तयारी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...