आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा केंद्र सरकारतर्फे पुणे जिल्ह्यातील खोदड येथे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेत जालना शहरातील जनता हायस्कूलचे विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक संतोष पिराजी गंडाळ यांच्या सौरऊर्जा चलित गवत कापणी यंत्राच्या मॉडेलला देशात तृतीय क्रमांक मिळाला. देशभरातून आलेल्या ६६८ मॉडेलमधून शिक्षक गटातून त्यांनी यश मिळवले असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जायंट मिटरव्हेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पातळीवर हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार गंडाळे यांनी www.growingdots.in या संकेतस्थळावर सौरउर्जाचलित गवत कापणी यंत्राची व्हिडीओसह माहिती अपलोड केली. दरम्यान, १ मार्च २०२३ रोजी घोषित निकालात त्यांच्या या कृतीयुक्त मॉडेलला तिसरा क्रमांक मिळाला. याबाबतची माहिती त्यांना ई-मेलद्वारे कळवण्यात आली तसेच मोबाइलवर संदेश पाठवत त्यांना संस्था कार्यालयात बोलावून घेण्यात आले. त्याठिकाणी जीएमआरटीचे अधिकारी जे. के. सोळंके यांच्या हस्ते गंडाळ यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यात एक साेलार प्लेट, बॅटरी, डायड (जे नॉनरिटर्नचे काम करते), ब्लेड व वायरची प्लास्टिक पाइपला जोडणी करून हे यंत्र बनवण्यात आले आहे. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्मित उर्जा बॅटरीत साठवून स्विचऑन करून ब्लेड-कटरला गती दिली जाते व काम झाल्यावर ते थांबवता येते.
हा कृतीयुक्त प्रयोग, अधिक संशोधनाची आवश्यकता
शेतीपिकातील तण ही प्रमुख समस्या असून वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे तण वाढत जाते व पिकांची वाढ खुंटते. पाश्चात्य देशात तणनाशकावर बंदी असून कंपन्यांवर दंडही ठोठावला आहे. त्यामुळे निसर्गाला हानी न पोहोचता कमी खर्चात तण काढणीचे कृतीयुक्त मॉडेल तयार केले. याची केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेने नोंद घेतली, यात आणखी संशोधन झाल्यास मोठ्या क्षमतेचे तण काढणी यंत्र तयार होऊ शकते, जे भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. - संतोष गंडाळे, विज्ञान शिक्षक, जनता हायस्कूल, जालना
सीताफळ बागेतील वाढत्या तणामुळे सुचली कल्पना
संताेष गंडाळ यांची जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे शेती असून त्यात सीतफळाची बाग आहे. या बागेत सतत तण वाढत असल्यामुळे ते काढण्यासाठी मजूर लावावे लागत किंवा तणनाशक हा पर्याय असत. उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे तण काढण्यासाठी स्वस्तात काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करत असतानाच त्यांना सौर उर्जा चलित गवत कापणी यंत्राची कल्पना सुचली व त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.