आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल होत असतात. यातच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रत्येक विषयातील मूलभूत संबोधाचे परिपूर्ण ज्ञान होण्यासाठी शिक्षकांनी उपक्रमाधिष्ठित अध्यापन करावे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांनी केले.
ओम शांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबड येथे मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन व शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, जालिंदर बटुळे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विपुल भागवत, अधिव्याख्याता विनोद राख, श्रीहरी दराडे, प्रेरणा मोरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महेश गोडबोले, भगवान परिहार, चव्हाण, डॉ. गोदावरी उगले, शिवाजी उगले यांची उपस्थिती होती. डॉ. कांबळे म्हणाले, शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत राज्य पातळीवरील शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पोहचवणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच शैक्षणिक गुणवत्ता कशा प्रकारे वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या परिषदेत नविन शैक्षणिक धोरण या विषयावर अधिव्याख्याता श्रीहरी दराडे, शैक्षणिक व्यवस्थापनाची गतिमानता व अध्ययन क्षेत्र कृतियोजना या विषयावर जेष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, शालेय लाभाच्या व शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन या विषयावर उप शिक्षणाधिकारी विपुल भागवत, ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर अधिव्याख्याता प्रेरणा मोरे, करिअर मार्गदर्शन या विषयावर अधिव्याख्याता विनोद राख व जिल्हा समुपदेशन प्रमुख डॉ. गोदावरी उगले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अंबड तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.