आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरासाठी नवीन वीज कनेक्शन घेण्याकरिता साडेचार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणचा तंत्रज्ञ व खासगी व्यक्तीस लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी १.२५ वाजता पकडले. अंबड शहरातील सुरंगेनगरात वैद्यराज शाळेच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली.
शिवलिंग पंढरीनाथ डोंगरे (३७, रामगव्हाण, ता. अंबड) व सय्यद नदीन सय्यद कमरोद्दीन (२९, खस्ती मोहल्ला, खंडोबा मंदिराजवळ, राम मंदिर रोड, अंबड) अशी आरोपींची नावे आहेत. यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना सरस्वती मंगल कार्यालयाजवळील घरासाठी नवीन वीज कनेक्शनसाठी तंत्रज्ञ डोंगरे यांनी ५ हजारांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत विभागाकडे संपर्क करून तक्रार दिली. या तक्रारीची २४ मे २०२२ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तंत्रज्ञ डोंगरे याने ५ हजारांची मागणी करत तडजोडीअंती ४ हजार ५०० रुपये घेणार असल्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तंत्रज्ञ डोंगरे याने तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारून खासगी व्यक्ती सय्यद नदीम सय्यद कमरोद्दीन याच्याकडे दिले. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. डीवायएसपी सुदाम पाचोरकर, पोलिस अंमलदार ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, ज्ञानेश्वर म्हस्के, कृष्णा देठे, गणेश बुजडे आदींनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.