आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:लोडशेडिंगमुळे दहा एकरातील टरबूज जळाले; साडेतीन लाख रुपये खर्च करून लावलेली टरबूज

परतूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणू संसर्गामुळे गेली २ वर्ष फटका सहन करावा लागलेल्या टरबूज उत्पादकांना यंदा चांगला भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच १२ ते १८ रुपये प्रती किलो या प्रमाणे भाव मिळू लागल्याने टरबूज उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजार पेठेत तेजी असल्याने गत दोन वर्षातला तोटा भरून काढता येईल या हेतूने तालुक्यातील येनोरा येथील शेतकरी युवक पांडुरंग भुंबर यांनी आपल्या १० एकर शेतात टरबूजाची लागवड केली आहे. जमिनीची मशागत आणि बी-बियाणे,खते आणि मल्चिंग आदीसाठी त्यांना जवळपास ३ लाख रुपये खर्च करावा लागला. तीन लाखांच्या खर्चावर सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी भुंबर यांना अपेक्षा होती. सध्या पिक फळाच्या अवस्थेत असतांना महावितरणने एक दिवस आड सुरु केलेल्या भारनियमणामुळे पाण्याचा तान सहन न झाल्याने अनेक वेल कोमेजून गेले आहेत.

पांडुरंग भुंबर आणि इतर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार येनोऱ्यात एक दिवसआड वीजपुरवठा केला जातो. वाढती उष्णता आणि दिवसभराचे भारनियमामुळे पाणी देता येत नसल्याने अर्धवट वाढ झालेली फळे जागेवरच करपून जात आहेत. महावितरणचे भारनियमनाचे वेळापत्रक बदलले नाही तर येत्या ४ ते ५ दिवसात संपूर्ण १० एकरातील टरबूजावर नांगर फिरवावा लागेल अशी स्थिती आहे. महावितरणने भारनियमनाचे वेळा पत्रक बदलावे या मागणीसाठी येनोरा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी महावितरणचे परतूर येथील उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. मागणी वाढल्याने सबडिव्हिजनवर ओव्हर लोड येत आहे. ओव्हर लोडचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामीण भागात टप्याटप्याने विद्युत पुरवठा केला जात आहे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फळांच्या वाढीच्या काळात टरबूजाला दररोज पाणी द्यावे लागते. यंदा उष्णतेचे प्रमाण जास्त वाढल्याने पाण्याची गरज जास्त प्रमाणात आहे. एक दिवस आड वीज पुरवठा होत असल्याने फळाची पाण्याची गरज भागवली जात नाही, परिणामी अनेक झाडे सुकून जात आहेत.

मोठी अपेक्षा ठेवुन एवढा खर्च आणि मेहनत करून जोपासलेली वाडी डोळ्यादेखत जळत असल्याचे पाहण्याचे आमच्यात धाडस नाही. महावितरणने यावर तातडीने उपाययोजना करावी असे येनोरा येथील शेतकरी पांडुरंग भुंबर यांनी सांगीतले.