आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाच्या क्षणी दु:खाचा डोंगर:मुलीचे थाटात लग्न लागल्यानंतर वडिलांचा अपघात, वऱ्हाडींना करावे लागले अंत्यसंस्कार

पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीचे लग्न थाटात लागल्यानंतर पुढील धामधूम सुरू होती. यातच वधूपिता काही कामानिमित्त रस्ता ओलांडत पलीकडे जात असताना अचानक भरधाव वाहनाने वधूपित्याला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान भोकरदन तालुक्यातील भोकरदन-जाफराबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव येथे घडली.

एकीकडे सासरी जाण्याची गडबड, तर दुसरीकडे...

घटनेमुळे लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर वधूपित्यावर अंत्यसंस्काराची वेळ आली. राजू शेषराव खंडागळे (४८) असे या अपघातात मरण पावलेल्या वधूपित्याचे नाव आहे. एकीकडे मुलगी सासरला जाण्याची गडबड आणि दुसरीकडे हा प्रकार झाल्याने अतिशय विदारक दृश्य या ठिकाणी निर्माण झाले होते.

अज्ञात वाहनचालकाचा पळ

भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील राजू खंडागळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा मंगळवारी रात्री सुरू होता. लग्नामुळे परिवारात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर वधूपिता राजू खंडागळे काही कामानिमित्त गावातील भोकरदन-जाफराबाद मुख्य रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. तेथून वाहनासह पळ काढला.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

याची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी तातडीने राजू खंडागळे यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सोन्नी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने खंडागळे कुटुंबातील आनंदाचे वातावरण दुःखात बदलून गेले. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून बुधवारी सकाळी विरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला. यापूर्वीदेखील विरेगावजवळ अशा प्रकारे अपघात घडून अनेकांना प्राण गमवावे लागले.

बातम्या आणखी आहेत...