आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल दत्तक:मूल दत्तक प्रक्रिया कोर्टाऐवजी जिल्हाधिकारीच करणार पूर्ण

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून कोर्टाएेवजी जिल्हाधिकारी अर्थात जिल्हा दंडाधिकारी व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच पूर्ण केली जाणार आहे. यात अनाथ असो की नातेअंतर्गत मूल दत्तक देण्याबाबत येत्या १४ नोव्हेंबरपासून जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाकडून जनजागृती करण्यात येणार आहे.

यात मूल दत्तक घेण्यासाठी सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीच्या (CARA) वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक असून उपलब्ध मुलांच्या आधारावर यादी तयार करण्यात येते. त्यानंतर अनाथालयामध्ये दाखल केलेल्या जाणाऱ्या मुलांच्या उपलब्धतेनुसार गरजू व पात्र जोडप्यांना मूल दत्तक देण्यात येते. दरम्यान, नोव्हेंबर जागतिक दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत असून दत्तक कायद्याविषयी जनजागृती केली जात आहे. जालना जिल्ह्यातही शाळा, महाविद्यालय तसेच महिला सभा, ग्रामसभेत याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी सांगितले. तर नातेअंतर्गत प्रक्रियेचे तीन प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी दिली.

अशी आहे दत्तक प्रक्रिया : दत्तक इच्छुक पालकांनी cara.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

शिशुगृह किंवा जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडून गृहभेटीचा अहवाल अपलोड केला जातो. एक महिन्याच्या अंतराने ३ मुलांचा संदर्भ पालकांना दिला जातो. त्यानंतर ४८ तासांच्या आत मूल निश्चित केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांचे मूल्यांकन होते. जिल्हा महिला बालविकास विभाग प्राप्त अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतात. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ६० दिवसांच्या आत मूल दत्तक देण्याचे आदेश देऊ शकतात.

मूल दत्तक प्रक्रियेसाठी संकेतस्थळाला द्या भेट
मूल दत्तक प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://cara.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...