आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज देशात वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते किंवा त्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाही देशात वेगळा विचार मांडणाऱ्यांची भीती व्यवस्थेला का वाटते आहे? प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, वेगळा विचार मांडता आला पाहिजे. सर्वसामान्य माणूस हाच “आम्ही भारताचे लोक’चा केंद्रबिंदू आहे, असे मत ‘दैनिक दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले. अंबड येथे आयोजित यशवंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले त्या वेळी ते बोलत होते.
आवटे यांनी ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर मांडणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. छत्रपती शिवरायांना जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणे थांबवले पाहिजे. कारण, ते विशिष्ट जाती-धर्माचे नव्हते, तर संपूर्ण जगाचे आणि मानवजातीचे प्रेरणास्रोत होते, असे आवटे या वेळी म्हणाले. इतिहासाची सोयीची मांडणी करण्याचा प्रकार थांबवणे आवश्यक आहे. कोरोना काळात अनेक मुद्दे माध्यमांनी समोर आणले.
यात कोरोनासाठी तबलिगींना जाणीवपूर्वक जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला गेला. यात शेवटी न्यायालयाला मत मांडावे लागले. काही दिवसांपूर्वी माध्यमांचे अर्णबायझेशन पाहायला मिळाले. भारताची राज्यघटना ही सर्वसामान्य भारतीय माणूस केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानले जात असताना त्याच्या विपरीत वर्तन होत असेल तर एकूणच व्यवस्थेबद्दल विचार करावा लागेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वेगळी स्वप्नं बघणारा, भविष्याच्या दिशेने जाणारा भारत घडवण्यासाठी प्रयत्न केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात समतेचा पाया रचला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये महत्त्वाची होतीच. त्याच दिशेने गांधी-नेहरू-आंबेडकर यांनी प्रयत्न केले. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता याबाबत तिघांचेही एकमत होते. कृष्णवर्णीय माणूस व्हाइट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी २०१० हे साल उजाडावे लागले. परंतु आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करून त्यापूर्वीच हे कार्य केले. त्यामुळे आपल्याला देशाचा वारसा व आरसा समजून घ्यावा लागेल. वेगळा विचार मांडणारे दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला. या व्यवस्थेला वेगळा विचार करणारांची भीती का वाटते, असा प्रश्नही ‘दैनिक दिव्य मराठी’चे राज्य संपादक आवटे यांनी या वेळी उपस्थित केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.