आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:नैसर्गिक पद्धतीने व्यवस्था केलेल्या अंबडमधील मोती बारवेची दुरवस्था; पुढाकार घेण्याचे आवाहन

अंबड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या शाश्वत विकासाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पायाभरणी करताना भविष्यातील वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन पाण्याची नैसर्गिक पध्दतीने व्यवस्था बारवेच्या माध्यमातून केली होती. अंबड शहरातील प्रमुख बारवापैकी असलेल्या मोती बारवेची दुरवस्था झाली असुन या बारवेला गाळमुक्त करुन वाचवण्याची मागणी होत आहे.

शहरातील व्यंकटेश गार्डनच्या पाठीमागे असलेल्या भागाला मोतीबाग असे नाव होते. या परिसरात मोती बारव देखील असुन पुर्वी बारवेच्या पाण्याचा वापर होत होता. बारवेत उतरण्यासाठी दगडी पाय-या व कमान होती मात्र कुणीतरी अज्ञाताने बारवेची कमान जमीनदोस्त करुन पाणीदार बारव बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. या बारवेत आजही पाणी असुन केवळ जमिनीचा तुकडा विक्री करता यावा याकरिता हा खटाटोप सुरू असल्याची माहिती सुत्राकडुन कळाली आहे. बारमाही पाणी असलेल्या बारवांत काही लोक निर्माल्य, कचरा, बांधकाम साहित्य टाकुन बारव प्रदूषित करीत असतात. ज्यामुळे परिसरातील पाणी पातळी खोल जावून हापसा आणि बोरचे पाणी प्रदूषित होते.

मोतीबागेतील बारव जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. अंबड शहराची देशभरात बारवांचे शहर अशी निर्माण होवून दरमहा शंभर दीडशे अभ्यासक, पर्यटक, तिर्थयात्री, वाटसरु शहरातील बारवांना भेट देत असतात. शहराच्या पर्यटनात वाढ झाल्यास येथील व्यवसायाला चालना मिळुन स्थानिकांच्या रोजगारात वाढ होवू शकते याकरिता मोती बारव, पुष्कर्णी बारव, कावंदी बारव, महाद्वारी बारव, साखर बारव, नागोबा बारव वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र बारव मोहीमचे समन्वयक रामभाऊ लांडे यांनी सांगितले. तर शहरातील बारवा या सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रतिकं असुन त्याचे जतन संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. बारवेत कचरा टाकणा-या नागरिकांना समज देण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या दुर्लक्षाअभावी तसेच बेजबाबदारपणामुळे शहरातील बारवांना अवकळा आली आहे. बारवांचे पुनःजीवन झाल्यास आनंद होईल, असे अंबड शहरातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद झाडे यांनी सांगितले.

संवर्धनासाठी सामाजिक संस्था, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
अंबड शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बारव, मंदिराचा मोठा वारसा निर्माण केलेला आहे. मी शहरातील सर्व बारवा पाहण्यासाठी खास मुंबई वरुन आलो होतो या सर्व बारवांचे आम्ही मँपीग केलेले असुन देशभरातील बारवांचे जाळे तयार करुन जगभरातील लोकांना, अभ्यासकांना बारवांचे पर्यटन करता यावे आणि आपल्या बारवांचा इतिहास माहिती व्हावा याकरिता आम्ही महाराष्ट्र बारव मोहीमेच्या माध्यमातून बारव संवर्धनासाठी लोकांना सहभागी करुन घेत वेगवेगळे उपक्रम करीत असतो. अंबडची मोती बारव संवर्धनासाठी शहरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र बारव मोहीमचे मुख्य समन्वयक रोहन काळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...