आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:परिचारिकांचे कोरोनाकाळातील दिलेले योगदान सर्वात मोठे होय; डॉ. श्रीमंत मिसाळ यांचे प्रतिपादन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षीपासून देशाला कोरोना नावाच्या महामारीने ग्रासले आहे. या काळात कुटुंबापासून दूर राहून कोरोनाबाधीत रुग्णांची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या परिचारिकांचे कोरोनाकाळातील योगदान सर्वात मोठे आहे. त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला आपण सलाम करतो, असे गौरवोद्गार विवेकानंद हॉस्पिटलचे विश्वस्त सर्जन डॉ. श्रीमंतराव मिसाळ यांनी काढले. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या महान परिचारिका यांच्या जयंतीनिमित्त जागतिक परिचारिकादिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ जालनातर्फे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल जालना येथे कार्यरत सर्व महिला व पुरुष परिचारक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, याप्रसंगी डॉ. मिसाळ बोलत होते.

प्रारंभी लायन्स अध्यक्ष मीनाक्षी दाड, जयश्री लड्डा यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. डॉ. मिसाळ म्हणाले, कोरोना काळात परिचारिका या कर्तव्यापासून कधीही दूर गेल्या नाहीत. कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा केली. रुग्णांनाच त्यांनी आपले कुटुंब समजले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील त्यांचे काम प्रभावी राहिले. भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत त्यांची जबाबदारी अधिक वाढेल.

परिचारिकांनी या काळात केलेले कार्य इतरांना प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले. डॉ. हवालदार यांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प का म्हटले जाते, या विषयी माहिती दिली. डॉ. गोयल यांनी त्यांची रुग्ण सेवेविषयी आस्था व रुग्णा विषयीचे प्रेम याबाबत मार्गदर्शन केले, सर्व परिचारकांनी मनोभावातून रुग्ण सेवा करावी, असे आवाहन केले. यावेळी क्लब तर्फे सर्वांना भेट वस्तु म्हणून पाणी बॉटल व मास्क देउन सर्व परिचारिकांचा सम्मान करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. कासट, डॉ. सचदेव, डॉ. हवालदार, डॉ. अनिल कायंदे, लता मिसाळ, विजय दाड यांची उपस्थिती होती. प्रकाश कुंडलकर यांनी आभार मानले. दरम्यान, जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफला पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक डॉ. शिवदास मिरकड, डॉ. शाम बागल उपस्थित होते. तर परिचारिका दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउनतर्फे गणेश हॉस्पिटलमध्ये परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. संतोष भाले, प्रशांत बागडी, सुरज गेही, धवल मिश्रीकोटकर, सागर दक्षिणी, प्रतिक नानावटी, रोमीत भक्कड, विरेश बगडिया, दीपक अग्रवाल, मधु राठी, अॅड. अश्विनी धन्नावत, अॅड. बॉबी अग्रवाल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...