आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या सांस्कृतिक विविधतेतून एकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन परतूर येथील विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे शनिवारी भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेषराव बाहेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक संदीप बाहेकर, डॉ. प्रमोद आकात,मुख्याध्यापक भालचंद्र महाजन, संगीता शिंदे आदींची उपस्थिती होती. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या प्राकृतिक विभागात वेगवेगळी बोलीभाषा बोलली जाते.
प्रदेशानुसार लोकांच्या राहणीमान, आहार, आचार यांच्यामध्ये विविधता पाहायला मिळत. सांस्कृतिक, सामाजिक आणि प्राकृतिक बाबतीत विविधता असूनही एक राष्ट्र म्हणून आपण एकतेच्या सूत्रात बांधले गेलो आहोत. बोलीभाषा, राहणीमान जरी वेगळे असले तरी पंजाबचा एखादा व्यक्ति महाराष्ट्रीय या नात्याने वेगळा वाटत नाही. आपला देश बांधव म्हणून तो कायम आपल्याला जवळचाच वाटत असतो.
शालेय वयातील मुलांना देशातील विविध भागातील संस्कृतीची ओळख व्हावी, देशातील प्रसिद्ध व्यक्ति, ठिकाणे, प्रमुख सण आदीबाबत महत्वाची माहिती मिळावी या हेतूने या प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक भालचंद्र महाजन यांनी दिली. या प्रदर्शनात देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या भागात असणारी राष्ट्रीय स्मारके, एतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे आदींच्या प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यानी या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. यात प्रामुख्याने उत्तर विभागात येणारा दिल्ली येथील लाल किला, संसद भवन,कुतुब मिनार, लोहस्तंभ, अशोक स्तंभ, ताजमहल, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आदींच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.
पश्चिम विभागातील प्रसिद्ध संत या प्रकारात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत जलाराम यांच्या विषयी अधिक माहिती देणारे फलक या लावण्यात आले होते. प्रसिद्ध व्यक्ति या सदरात महर्षि कणाद, भास्करचार्य, महात्मा फुले, सचिन तेंडुलकर, दादासाहेब फाळके, विजय भटकर, जमशेदजी टाटा यांच्या विषयी माहिती फलकाचे समावेश करण्यात आला होता. भारतात साजरा केल्या जाणाऱ्या पोंगल, ओनम, दुर्गा उत्सव, बिहू, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, लोहरी, बैसाखी आदी सणांविषयी माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यानी त्या त्या सणाला वापरल्या जाणारे पोशाख परिधान करून माहिती दिली.यावेळी पालकही उपस्थित होते.
सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक अशा प्रकारच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक, राष्ट्रीय एकात्मता या सारख्या मूल्यांचा विकास होते. विविध राज्यात साजरा केले जाणाऱ्या पारंपरिक सण, उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातात याची माहिती विद्यार्थ्याना झाली. प्रतिकृति तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सखोल वाचन करावे लागले, यामुळे त्यांच्यात संबंधित विषय ज्ञानामध्ये वाढ झाल्याचे दिसून आल्याचे संदीप बाहेकर म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.