आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील बेथलहेम येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला मृतदेह सापडले नव्हते. शनिवारी औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह सापडले. जुनेद फिरोज बागवान (१४, रा.खडकपुरा, जालना), नदीम खान बाबूखान (१७, रा. बैदपुरा सदर बाजार, जालना) अशी मृतांची नावे आहेत.
जालना शहरातील जुनेद बागवान, नदीम खान, सलमान शेख, रियान बागवान हे चौघे मित्र शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास रेवगाव रोडवरील बेथलहेम शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेले होते.
जुनेद व नमीद हे दोघे पाण्यात उतरले. त्यांच्या पाठोपाठ सलमानही उतरला; परंतु जुनेद व नमीद हे खोल पाण्यात गेले. ते दोघे बुडत असल्याने सलमान परत आला. त्याने आजूबाजूच्या नागरिकांना आवाज दिला. मात्र, तेथे कोणी नसल्याने मदत मिळाली नाही. नातेवाईक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.
मात्र, पाऊस सुरू असल्याने तसेच तलावात पाणी असल्याने शोधकामात अडथळा येत होता. त्यामुळे ९ वाजेच्या सुमारास शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी औरंगाबाद येथील अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शोध घेतल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह सापडले. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचा दफनविधी करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.