आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर परिषदअंतर्गत मोती तलावालगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाला काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. टप्प्याटप्प्याने तब्बल दीड ते दोन कोटींहून अधिक रुपयांचा खर्च झालेली ही वास्तू केवळ नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडून आहे. यामुळे देखभाल-दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जालनेकरांसाठी पुन्हा सुरू करावा, अशी मागणी जलतरणपटूंकडून केली जात आहे. तसेच अवघ्या ६० किमी अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात मनपा बाराही महिने जलतरण तलाव सुरू ठेवते, मग जालन्यात का नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तत्कालीन नगराध्यक्षा भास्कर अंबेकर यांनी पुढाकार घेऊन वर्ष २००६-७ मध्ये जालनेकरांसाठी छत्रपती संभाजी उद्यानाचे सुशोभीकरण केले, जलतरण तलावही बांधला. तब्बल १० ते १२ वर्षे कधी बंद-कधी सुरू अशा पद्धतीने जलतरण तलाव सुरू राहिला, मात्र, ४ जून २०१८ चंदनझिरा भागातील एका शिक्षकाचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला.
त्या वेळी तलावात जीवरक्षक नाही, पोहणाऱ्यांसाठी कुठल्याही सोयी-सुविधा नाही, प्रशिक्षित जीवरक्षक नेमला असता तर संबंधित शिक्षकाचा जीव वाचला असता असे म्हणत नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही झाली. यापासून धडा घेत जीवरक्षक नेमून जलतरण तलावात अद्ययावत सुविधा देणे अपेक्षित असताना पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले ते अाजतागायत कायम आहे.
तलाव चालवता येईना
छत्रपती संभाजीनगरात वर्ष २००० मध्ये सर्वसामान्यांसाठी मनपाने सिद्धार्थ जलतरण तलाव उभारला तेव्हापासून आतापर्यंत बाराही महिने हा सुरू आहे. ५० मीटर बाय २१ मीटर व १२ मीटर बाय २१ मीटर असे दोन जलतरण तलाव असून ते मनपा स्वत: चालवते.वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७६ लाख ८९ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न या जलतरण तलावातून मनपाला मिळाले. मात्र, ६० किमी अंतरावरील जालना पालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव चालवता येईना.
जलतरण तलावाजवळ जाणेही अवघड
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव व इमारतीला झाडाझुडपांचा विळखा पडला असून तलावापर्यंत जाणेही अवघड होऊन बसले आहेत. हीच संधी साधून मद्यपींनी या ठिकाणी आपला अड्डा बनवला आहे. शहरातील सर्वच वयोगटातील पोहणाऱ्यांसाठी उभारलेली ही वास्तू धूळ खात पडून आहे.
खोली कमी करायचीय
सदरील जलतरण तलावाची खोली १४ फुटांपर्यंत असून ती कमी करावयाची आहे. तसेच इतरही कामे करणे आहे. यासंदर्भात आर्थिक तरतूद करून लवकरच जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा मानस आहे. - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, न.प.,जालना.
पोहणे शक्य नाही
सर्वांनाच खासगी जलतरण तलावात पोहणे शक्य नाही. जुना जालन्यातून नवीन जालन्यात ये-जा करण्यासाठी ५ किमी अंतर पडते, यामुळे वेळ व अधिकच्या शुल्काचा भुर्दंड पडतो. सामान्यांसाठी पोहण्याची सुविधाच नसेल तर जलतरणपटू तयार होतील कसे. - अॅड. शैलेश देशमुख, जालना
खासगी तलाव सुरू
शहरातील नवीन भागात एक, दोन नव्हे तर तीन ठिकाणी खासगी जलतरण तलाव चालवले जातात. मात्र, पालिका एकमेव जलतरण तलावसुद्धा चालवू शकत नाही. खासगीचे शुल्क सर्वांनाच परवडत नाही. यामुळे अनेकांना पोहण्याच्या छंदाला मुरड घालावी लागत आहे. - ईश्वर बिल्होरे, नागरिक, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.