आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्त्वपरीक्षा:घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती  निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

विठ्ठल काळे |कुंभार पिंपळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील ९७ पैकी ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती घनसावंगीची मुदत संपल्याने बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक २९ जानेवारी रोजी १८ संचालकपदासाठी होत आहे. घनसावंगी तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाल्यापासून घनसावंगी तालुक्याचे आमदार राजेश टोपे यांचे वर्चस्व असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. परंतु मागील काळात भाजपचे माजी आमदार विलासराव खरात यांच्याशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेसचे 1१६ संचालक तर भाजपचे २ संचालक निवडून आले होते. परंतु आता घनसावंगी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगाव मधील अनेक दिग्गज पदाधिकारी, नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यामुळे आता शिंदे व ठाकरे गट अशी लढत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होण्याचे संकेत दिसत आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, काँग्रेस व अपक्ष या सर्व पक्षांच्या नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. इच्छुकांनी आतापासूनच जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी मात्र प्रत्येक गावाला राजकीय टच असतोच. तसे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत भाजप, शिंदे गट व ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अपक्ष पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

बाजार समिती हा तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करण्याची संधी समजली जाते. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी या निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख  डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार विलासराव खरात, रेणूका साखर कारखान्याचे सतीश घाटगे आदी दिग्गजांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्यानुसार त्यांनी दौरे सुरु केले असून मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करीत आहेत.

जि.प. आणि पं. स. इच्छुकांवर दिली जबाबदारी
ग्रामपंचायत निवडणूकपाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे ज्या गटातील व गणातील ग्रामपंचायत निवडणूक आहे. तेथील संभाव्य इच्छुकांना नेत्यांकडून जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर मिळणाऱ्या विजयाच्या समीकरणावर अनेकांची उमेदवारी अवलंबून असणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
२३ ते २९ डिसेंबर रोजीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविता व सादर करता येतील. मिळालेल्या नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धीनंतर ३० डिसेंबर रोजी नाम निर्देशन पत्रे छाननी करण्यात येईल. २ जानेवारी रोजी वैध नामनिर्देशन पत्राच्या प्रसिद्धी करण्यात येईल. २ ते १६ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येईल. १७ जानेवारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध व निशाणी चिन्ह वाटप करण्यात येईल. २९ जानेवारी रोजी मतदान करण्यात येईल आणि त्यानंतर ३० जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

१८ संचालक द्यायचे आहे निवडून
सहकारी संस्था मतदारसंघातून ७ उमेदवार, ग्रामपंचायत मतदार संघातून ८ उमेदवार, व्यापारी व आडते मतदारसंघातून २ उमेदवार, हमाली व तोलारी मतदार संघातून १ उमेदवार, असे एकूण मिळून १८ संचालकांना निवडून द्यायचे आहे. तर सहकारी संस्था ५७६, ग्रामपंचायत मतदार संघातून ८४६, व्यापारी व अडते मतदारसंघातून ३०२, हमाल व तोलारी मतदारसंघातून २६८ असे एकूण मिळून १९९२ मतदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...