आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेसहा लाख पळवले:डोक्याला गावठी कट्टा लावून चार मिनिटांत पळवले साडेसहा लाख, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात पेट्रोल पंपावर घडली घटना

कुंभार पिंपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला भररस्त्यात डोक्याला गावठी कट्टा लावून अवघ्या चार मिनिटांत साडेसहा लाख रुपये असलेली बॅग लांबवल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरून मॅनेजर जात होता. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्रीकृपा पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक नईम सय्यद हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पेट्रोलपंपापासून हाकेच्या अंतरावर असतानाच एका इंडिका विस्टा कारमधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी भररस्त्यात अडवली. त्यांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सय्यद यांना “पैशांची बॅग दे, अन्यथा जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिली. नईम सय्यद यांनी पैशांची बॅग आरोपींच्या स्वाधीन केली. आरोपींनी ६ लाख ५१ हजार ८४० रुपये असलेली बॅग घेऊन परतूरच्या दिशेने धूम ठोकली. त्यानंतर नईम सय्यद यांनी याची माहिती पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना दिली. तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक एस. मरगळ हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात चोरट्यांची कार दिसत आहे. दरम्यान, बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचे जिल्ह्यात महिन्याभरात तीन घटना घडल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात इतर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...