आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेस प्रारंभ:आन्वा येथे आजुबाई देवीच्या यात्रेस प्रारंभ आज निघणार आजुबाई देवीची गावात स्वारी; भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवीची यात्रा महोत्सवास प्रारंभ

आन्वाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवीची यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला असून मुख्य उत्सव म्हणजे स्वारी असतो. शनिवारी रात्री आजूबाईची स्वारी काढण्यात येणार आहे. चैत्र शुध्द तृतीयापासून पासून राम नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. तृतीयाच्या दिवशी मंडप उभारणी, पहिल्याच दिवशी गावातून पालखीतून श्री ची मिरवणूक काढण्यात आली.

मंडप उभारणी नंतर यात्रा संपेपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यात्रा काळात गावातील नागरिक व महिला बाहेरगावी मुक्कामी थांबत नाहीत. गावातून चार दिवस गावातून रोज निघून सोंग, पोत खेळतात. अष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरात कडक उपवास केला जातो. अशी परंपरा आहे. यात्रेबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते.

प्राचीन काळात अनंतपूर (आजचे आनवा )हे गाव प्रसिध्द होते सुमारे ४५० वर्षापूर्वी या गावात तुकाराम पंत नावाचे एक ग्रहस्थ राहात होते. त्यांना संतती सुख नसल्यामुळे ते फार दुःखी होते. काही तीर्थयात्रा करावी म्हणून नवरात्रात तुळजापूरला गेले. त्यांनी संतती प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. देवी प्रसन्न होत नसल्यामुळे त्यांनी देह त्यागण्याचे ठरवले. अष्टमीच्या रात्री होम हवन करून त्यांनी यज्ञकुंडात उडी घेतली. याच वेळी आई तुळजाभवानी प्रगट झाली. आपल्याजवळ सारे वेभव आहे परंतु संततीसुख नसल्याचे त्यांनी मातेला सांगितले.

त्यावेळी माता तुळजाभवानीने तुमच्या पोटी मी अवतार घेईन असे वचन दिले. त्यानंतर आन्वा येथे तुकाराम पंतच्या उदरी ४ शालिवाहन शके १४९४ बुधवार रोजी मातेने जन्म घेतला. तिचे नाव आजुबाई ठेवण्यात आले. केवळ पाच वर्षाच्या कार्यात आजुबाईने अनेक चमत्कार गावात घडवले. राजा हिमांशु हा देवीपुढे नतमस्तक झाला. तेव्हापासून आन्वा येथील हे स्थान आजुबाईच्या नावाने प्रसिध्द आहे. चैत्र शुध्द तृतीया पासून रामनवमी पर्यंत येथील उत्सव साजरा करण्यात येतो.

बालब्रम्हचारी लक्ष्मीकांत महाराज यांचे वंशज सोनू महाराज यांच्या अंगात अष्टमीच्या दिवशी स्वारी येते. त्या दिवशी रात्री दहा वाजता सोनू महाराज यांना गावातील मंदिरात आणले जाते. त्यांना देवी समोर बसून आदण्या दिली जाते. नंतर त्यांना स्वारी चे स्वरूप देण्यासाठी नेण्यात येते. स्वरूप देणाऱ्या ठिकाणी सप्तशतीचे पाठ चालू असतात. स्वारी निघतेवेळी गोंधळी मंडळी गोंधळ घेऊन जन्मस्थानी मंडपात येतात. त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेले हजारो भक्त आपल्या पोती प्रज्वलित करतात. याच वेळी आजुबाईची स्वारी निघते. भक्त आपल्या पोती घेऊन पुढे सरसावतात व आजुबाई की जय या नावाने परिसर दुमदुमुन जातो. ४वर्ष वयाच्या मुलापासून वृध्दापर्यंत भक्त यावेळी पोत खेळत आपला नवस पूर्ण करतात.