आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्‍पासाठी दूर्वा आणायला गेलेल्‍या चिमुकलीवर अत्‍याचार:नराधम सीसीटीव्हीत कैद पण अद्याप अटक नाही, सेलूतील घटना

जालना/सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्हीत कैद झालेले दुचाकीस्वार. - Divya Marathi
सीसीटीव्हीत कैद झालेले दुचाकीस्वार.

गणेशाेत्सव असल्याने सेलू तालुक्यातील एक दहावर्षीय मुलगी व तिचा समवयस्क मावस भाऊ दाेघेही दूर्वा आणण्यासाठी गावापासून शेताकडे जात हाेते. तितक्यात दुचाकीवर दाेन तरुण त्यांच्याजवळ आले व दाेघांना बळजबरी दुचाकीवर बसवून साडेतीन ते चार किमी अंतरावर एका शिवारात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर साेडून त्यांनी पळ काढला. अत्याचार करणारे दाेन्ही नराधम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. २४ तास उलटूनही त्यांना अटक झालेली नाही.

पीडितेच्या नातेवाइकाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह सेलू शहराजवळ राहते. दरवर्षी गणेशाेत्सवात दहा दिवस पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय शेतातून दुर्वा आणून त्याचे हार बनवत विविध गणेश मंडळांना देत असत. ५ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ती मुलगी व तिचा मावस भाऊ असे दाेघे दूर्वा आणण्यासाठी घरापासून दीड किलाेमीटर अंतरावरील शेतात जात हाेते. काही अंतर कापल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर दाेघे आले. दाेघांचे चेहरे मास्कने झाकलेले हाेते. त्यांनी भाऊ-बहिणीला बळजबरी दुचाकीवर बसवले. साधारण तीन ते चार किमी अंतर गेल्यानंतर एका फाट्यावर मुलाला दुचाकीच्या खाली उतरवले व मुलीला घेऊन पुढे निघून गेले. पुढे दाेन-अडीच किमी एका शिवारात नेत तिच्यावर दाेघांनी अत्याचार केला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलिस अधिकारी अबिनाशकुमार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक चव्हाण, रावसाहेब गाढेवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दोन दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. लवकरच आराेपींना पकडण्यात येईल, असे सेलू येथील पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...