आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळपास ३० हजार रहिवाशांसाठी जालना शहरात येण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रेल्वेस्थानकाजवळील भूमिगत पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून सिमेंटचे बॉक्स तसेच सिग्नल यंत्रणा स्थलांतरित झाली आहे. सर्वात मोठे काम पूर्ण झाले असून आता मजबुतीकरण तसेच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकूणच कामाला मार्च महिना उजाडणार असून यानंतर पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जालना शहर हद्दीतील जमुनानगर, रेल्वे कॉलनी, आनंदनगर, भक्तनगर, विद्युत कॉलनी, बँक कॉलनी आदी परिसरासह रेवगाव मार्गावरून जालन्यात येणाऱ्या व्यक्तींना रेल्वेस्थानकाजवळील गेट क्रमांक ७८ वरून ये-जा करावी लागते. वाहतुकीची व्यवस्था, रुग्णालये, बाजारपेठ, भाजीपाल्यासाठी बाजारपेठ आदींमुळे मोठ्या प्रमाणात रहदारी या गेटवरून आहे. दरम्यान, या ठिकाणी २०१४ - १५ च्या रेल्वे बजेटमधून ३ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजनही केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी झाले आहे.
या कामाला डिसेंबर २०२२ मध्ये मुहूर्त मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी रेल्वे रुळाचे स्थलांतर, सिग्नल यंत्रणा तसेच रुळाची दुरुस्ती ही कामे पूर्ण करण्यात आली आहे. रेल्वेचे अभियंते, कंत्राटदार आणि कामगार यांच्या माध्यमातून कामाला गती मिळाली आहे. लवकरच हे काम पूर्ण करून भुयारी पूल नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे रेल्वेस्थानक प्रमुख आर. बी. मीना यांनी सांगितले.
३:३० तासांचा रेल्वे ब्लॉक संपला, गाड्यांची गती कायम
रेल्वेकडून हाती घेण्यात येणाऱ्या भूमिगत पुलाच्या कामासाठी काही दिवस दिवसाला ३:३० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान तासी २० किमीच्या गतीने रेल्वेगाड्या जालना रेल्वेस्थानकातून धावल्या. दरम्यान, हा ब्लॉक बंद झाला असून आता रेल्वेगाड्यांची गती पूर्वपदावर आली आहे.
पुलाजवळील सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था महत्त्वाची
दक्षिण मध्य रेल्वेच्या मराठवाडा विभागातील या रेल्वे लाइनवर तयार करण्यात आलेले भुयारी पूल भागातील पाण्यामुळे भरतात, असा अहवाल आहे. यामुळे जालना रेल्वेस्थानकाजवळील भूमिगत पुलाचीही हीच स्थिती राहणार आहे. परिणामी पुलाजवळील सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था काळजीपूर्वक होणे अपेक्षित आहे. नसता पावसाळ्यात पाण्यामुळे पूल बंद ठेवण्याची वेळही येऊ शकते. याच कारणामुळे भूमिगत पुलाच्या कामाला वर्षभरानंतरही विलंब झाला.
लवकरच पूल नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होणार
भूमिगत पुलाच्या कामाला गती मिळाली असून सिमेंट बॉक्स बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मजबुतीकरणाचे काम सुरू असून उर्वरित काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. लवकरच पूल नागरिकांच्या सेवेसाठी दाखल करण्यात येणार आहे. - के. एम. फारकी, एम टेक कन्स्ट्रक्शन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.