आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:मुलींनी वैज्ञानिक, संरक्षण क्षेत्राकडे वळण्याची गरज; लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे प्रतिपादन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रज्ञ होण्याचे बालपणी मुलींना आकर्षण असते ते पद्धतशीरपणे डांबून ठेवले जाते. दहावी, बारावीला मेरिटमध्ये झळकणाऱ्या विद्यार्थिनी कुठे जातात? नोकरी, उद्योगधंदे यात टिकून राहतात का? हा संशोधनाचा विषय आहे. यूपीएससीत मुली बाजी मारत असल्या तरी एकूण नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण दहा टक्के आहे. संरक्षण व वैज्ञानिक क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या संधी असून तरुणींनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन, दर्शना लिगल सेल व यंग जायंन्ट्स ग्रुपच्या वतीने गुरुवारी “माझा आयपीएस प्रवास” या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात मोक्षदा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. महेश धन्नावत, अॅड. अश्विनी धन्नावत, यंग जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष अॅड. बॉबी अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मोक्षदा पाटील यांनी बाल संगोपन, कुटुंबाबाबत वृद्ध आजी कडून मिळालेले धडे, कष्टाची कौटुंबिक पार्श्वभूमी, खटकणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत राहिल्याने प्रगल्भ झालेली जिज्ञासा, हैदराबाद प्रशिक्षण केंद्रातील अनुभव सांगून परीक्षेच्या तीन तासांतील कौशल्य पुढे अधिकारी म्हणून उद्भवलेल्या परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता सिद्ध करण्यास उपयोगी पडत असल्याचे नमूद करीत बालपणी खेळण्यांतून मुला-मुलींमध्ये भेदभाव बिंबवला जातो, मुलीच्या मर्यादा तिच्या मनात तयार होईल अशी व्यवस्था तयार केली जाते. हा भेदभाव बालपणीच संपवायला हवा.

पालकांनी दागिने, विवाहातील उधळपट्टी ऐवजी मुलीस स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तिच्या शिक्षणावर खर्च करावा, मुलींनी क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध करावे. शासकीय किंवा खासगी नोकरीत चुकीच्या गोष्टींवर महिला आक्षेप घेते, स्वतःची भूमिका मांडते तेव्हा तिला बाईपणाच स्वरूप दिलं जातं, नैसर्गिक भेदभाव असले तरी स्त्रियांचा मेंदू हा जैविक क्रांतीनुसार बनल्याचे नमूद करत मुलांना घरातूनच शिस्त, संस्कार, सभ्यता शिकवली तर पोलिसांचे काम कमी होईल स्त्रीवाद म्हणजे समान वागणूक मिळावी यासाठी चा अट्टहास असल्याचे मोक्षदा पाटील म्हणाल्या.

सूत्रसंचालन अॅड. अश्विनी धन्नावत यांनी तर अॅड. महेश धन्नावत यांनी आभार मानले. या वेळी पल्लवी अग्रवाल, दीपाली अंबेकर, कस्तुरी धन्नावत, धनंजय डिक्कीकर, प्रशांत बागडी, अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड.लखन मुंगसे, अॅड.बाबासाहेब इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील तरुणाईने ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...