आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर घसरले:कांदा गडगडला; कांद्याला सध्या 2 ते 8 रुपयांचा दर, खर्च निघत नसल्याने शेतकरी हतबल

बदनापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाचा वाढता तडाख्यामुळे मजूर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घरातील सदस्यांच्या मदतीने कांदा काढला मात्र, बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे.

मागील वर्षी कांद्याला भाव असल्यामुळे व यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा लागवडीकडे ओढ लागली होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आलेली होती. मागील वर्षी ऐन कांदा काढणीच्या वेळेसच अवकाळी पाऊस जोरदार हवेमुळे मोठे नुकसान सहन करावे लागणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा लवकरच कांदा काढणीस सुरुवात केली. मात्र उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे काढणीस मजूर मिळत नसल्यामुळे प्रसंगी कुटुंबातील सदस्यांनी, चिल्ल्या-पिल्ल्यांनी एकत्रित येत कांदे काढणी केली. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे आणि त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे.

तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही पण बाजारात मिळत असलेला भाव पाहता शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. अतिवृष्टी आणि अवकाळीच्या असमानी संकटातून बाहेर पडत नाही तो बळीराजा पुन्हा एकदा महावितरणाच्या लोड शेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटात सापडला आहे. त्यातच आता हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत असल्याने लावलेले खर्चही निघणे अवघड झाले आहे. मागील महिन्यात स्थिर असलेले व चांगले दर मिळत असलेल्या कांद्याच्या बाजारभावात दोन आठवड्यांपासून प्रतिक्विंटल हजार रुपयांची घसरण झाली.

अचानक झालेल्या घसरणीमुळे सारेच चक्रावले असून युक्रेन-रशिया युद्धाचे निमित्त करून तसेच वातावरणात काही काळ ढगाळ वातावरणाचे कारण दाखवून कांदा सट्टेबाजांनी कांद्याचे दर पाडले असल्यामुळेही कांदा भावात घसरण होऊन शेतकरी नागवला जात आहे. कांदा लागवडीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशक औषधी फवारणीसह काढणीसाठी सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक खर्च एक एकर कांद्यासाठी येतो. तर शेतकऱ्यांचे कष्ट वेगळे मात्र आज कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भावाने लागवड व मजुरीचा खर्चदेखील निघत शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भाव वाढण्याची शक्यता
सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील कांदा काढणीला आला असून बाजारात कांदा अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्याने बाजारभाव घसरला आहे. पुढील दोन महिन्यांत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे कांदा व्यापारी सलीम मदार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...