आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:डॉक्टर होऊन गेलेल्या पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्यास पकडले; दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे केली जप्त

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक दिवस शेतात राहून पोलिसांनी आरोपीची काढली माहिती

एक संशयित गुन्हेगार कमरेला दोन पिस्तुले लावून घरी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. आरोपीकडे थेट गेल्यानंतर तो गोळीबारही करू शकतो, अशी धास्ती पोलिसांमध्ये होती. त्या आरोपीला पकडायचे, परंतु त्याच्याकडून अचानक गोळीबार झाला तर पोलिसांनाही धोका होऊ शकतो. यामुळे जवळ पिस्तूल असलेले एपीआय शिवाजी नागवे आरोपीच्या वाड्यात घुसले.

कुणाला खोकला येतो का? गोळ्या घ्या, तपासणी करायचीय, असे म्हणत घरात घुसून पथकातील तीन जणांनी आरोपीला पकडले. यानंतर आरोपीने पत्रे उचकटून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. परंतु, इशारा करताच बाहेर थांबलेल्या पथकातील इतरांनी आरोपीस जेरबंद करून त्याच्याकडून दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त केली. एखाद्या चित्रपटासारखा असलेला हा थरार परतूर तालुक्यातील सातोना येथे घडला आहे. विष्णू रामभाऊ आकात (सातोना, ता. परतूर) असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सेलू, मानवत, परतूर येथे तपास कामासाठी फिरत होते. दरम्यान, विष्णू आकात हा गावठी पिस्तूल कमरेला बाळगून काहीतरी घातपात करण्याच्या इराद्याने परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने हा सापळा लावून त्यास जेरबंद केले. यानंतर अधिक विचारणा केली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, हेड कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विलास चेके, किरण मोरे, प्रशांत लोखंडे, पूनम भट्ट यांनी केली आहे.

ओडिशातून आणले पिस्तूल
संशयित आरोपी हा विष्णू रामभाऊ आकात (सातोना, ता. परतूर) हा गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आकात यांच्याविरुद्ध परभणी या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. नवी दिल्लीतून आलेल्या ओळखीच्या एका जणाकडून हे पिस्तूल विकत घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

पिस्तूल विक्रीचे नेटवर्क उघड करणार
अवैध पिस्तूल विक्रीचे नेटवर्क उघड करण्यासाठी आरोपींच्या दिलेल्या माहितीनुसार प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून खरेदी-विक्रीचे हे नेटवर्क उघड करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.

पोलिस तपासात खरी माहिती समोर येईल
संशयित आरोपीकडे पिस्तूल कसे आले, यापूर्वी विक्री झाली का? पिस्तूल कमरेला लावून काय गुन्हा करणार होता? पिस्तुलाची विक्री कितीमध्ये झाली? दोन-दोन पिस्तुले कशासाठी वापरत होता? याबाबत अधिकचा तपास परतूर पोलिसांकडून केला जाईल. -सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

बातम्या आणखी आहेत...