आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाची चाहूल:पुढील आठवडाभर पावसाची हजेरी, जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार पेरणीला गती

जालना2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 29 मे ते 7 जूनदरम्यान जिल्ह्यात लागणार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

राज्यासह जालना जिल्ह्यात २९ मे ते ७ जूनदरम्यान धो-धो पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे यंदा प्रथमच जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे. जिल्ह्यात यंदा ६.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीच्या तयारीला लागावे, असा इशाराच या वातावरणामुळे मिळाला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हाभरात सर्वच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात ३० मे ते ७ जूनदरम्यान पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरीप हंगामातील पेरणी वेळीच झाल्यास एकात्मिक कीड नियंत्रण तसेच शेतीमालाचे उत्पादनही चांगले होते. कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी २ लाख ८८ हजार ४५० हे. क्षेत्र कपाशी, तर १ लाख ४५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली राहणार आहे. मका ४८ हजार ९४० तर यापेक्षा जास्त म्हणजेच ६० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मूग व उडीद या आंतरपिकांचे क्षेत्र अनुक्रमे ३३ हजार व १३ हजार हेक्टर राहील.

यंदा सरासरी ९० टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची मोठी तयारी केली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत काही जण महागडे मात्र अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाकडे वळले आहेत. यामध्ये मिरची, हळद, अद्रक या पिकांबरोबर भाजीपाला पिकांमध्ये घेवडा, गवार, भेंडी तसेच टोमॅटोचीही लागवड यावर्षी चांगलीच होणार आहे. एकूणच हे क्षेत्र मोठे नसले तरी मोठ्या प्रमाणात उलाढाल यामध्ये होते. इतर पारंपरिक पिकांमध्ये यंदा लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.

आगामी खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात तब्बल १५ हजार हेक्टरवर क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. सोयाबीनला मिळालेला भाव बघता या पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून गतवर्षी १ लाख ३५ हजार ७५० हेक्टरचा अंदाज होता. यंदा त्यापुढेही जाऊन १ लाख ४५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी अपेक्षित करण्यात आली आहे. कपाशी २ लाख ९८ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज असून २ लाख ८८ हजार ४५० हेक्टर, मका ४२ हजार १७३ वरून यंदा ४८ हजार ९४० वर लागवड होईल. तुरीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दहा हजार हेक्टरने वाढ होणार असून तब्बल ६० हजार ३० हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.

पावसामुळे पेरणी लवकरच होणार
मराठवाड्यात ३० मे ते ९ जूनदरम्यान विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. हे वातावरण शेतीसाठी पोषक आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. जिल्ह्यातही वातावरणाचा प्रभाव कायम राहणार अाहे. शेतकऱ्यांनी शेती कामे उरकावीत, असा हा अंदाज आहे. वारे बदल झाला की, दिशा, ठिकाण वेळ बदलतो. पंजाब डख, हवामान अभ्यासक, सेलू

कामांना हातभार
सध्या शेतीची नांगरणी झाली असून जमीन तयार करण्यासाठी कडक ऊन तसेच मशागतीसाठी पावसाची गरज आहे. ही गरज पुढील आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे पूर्ण होणार आहे. यामुळे शेतीकामांना हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे पावसानंतर करून घ्यावी. १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा धोका पत्करू नये. श्रीकृष्ण सोनुने, वरिष्ठ शास्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जालना

मागील वर्षीचा पाऊस
जिल्ह्यात सरासरी पडणारा पाऊस ६८०.९ मिमी इतका आहे. मागील वर्षी तब्बल १०४३.५ मिमी पावसाने हजेरी लावली. २०१९ मध्ये ८२१.२ मिमी पाऊस झाला होता.

जिल्ह्यातील जमीन पेरणी

 • एकूण क्षेत्र : ७.७२ लाख हेक्टर
 • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​लागवडीखालील क्षेत्र : ६.७६ लाख हे.
 • खरीप हंगाम क्षेत्र : ६.१ लाख हेक्टर
 • फळपिके : ०.२६ लाख हेक्टर
 • सिंचनाखालील क्षेत्र : १.२४ लाख हे.​​​​​​​

६ लाख ५ हजार ६९० हेक्टरवर लागवड अशी

 • कपाशी २ लाख ८८,४५०
 • सोयाबीन १ लाख ४५,३००
 • मका ४८ हजार ९४०
 • तूर ६० हजार ३००
 • मूग ३३ हजार ११०
 • उडीद १३ हजार ५८०
 • बाजरी १४ हजार
 • इतर २ हजार २८०

बातम्या आणखी आहेत...