आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना फटका:पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव गडगडले

पिंपळगाव रेणुकाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात एकदमच भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने या बाजारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च देखील वसुल झाला नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे महागाईने मिळणारा भाजीपाला एकदमच स्वस्त दरात मिळू लागल्याने ग्राहक वर्गाच्या चेहऱ्यावर भाजीपाला खरेदी करताना उत्साह दिसून येत आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे सर्वात मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारात इतर दुकानासह भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात असतात. मागील काही महिन्यापासुन भाजीपाल्याचे भावात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी समाधानी होते. शिवाय मागील काही वर्षापासून पारंपारिक पिकातुन होणारे नुकसान पाहता तालुक्यातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेतीत उतरला आहे. त्यातुन त्याला चांगले उत्पादन देखील मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता झाला आहे.

यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने विहिरीत मुबलक पाणी आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत बऱ्याच शेतकऱ्यांनी सुध्दा मुळा, मेथी, वांगे, गवार, चवळी, भेंडी, कोंथबीर, टमाटा, गाजर, फुलकोबी, पत्ताकोबी, मिरची, काकडी आदी भाजीपाल्याची मोठा खर्च करुन लागवड केली आहे. भाजीपाल्यातुन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती लागेल अशी अपेक्षा होती. परंतु सगळीकडेच भाजीपाल्याचे प्रचंड उत्पादन झाल्याने व बाजार मंडीत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला स्थानिक आठवडे बाजारात विक्रीसाठी घेऊन यावा लागतो.

परंतु स्थानिक आठवडे बाजारातही मागणी पेक्षा पुरवठा जास्त असल्याने मागील दोन आठवड्यापासुन भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले आहे. दरम्यान मंगळवारी पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. पंरतु बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने आणलेला भाजीपाला शेतकऱ्यांना मातीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. येथील बाजारात पारध बु, पारध खुर्द, लेहा, शेलुद, वडोद तांगडा, धावडा, वालसांवगी, पद्मावती, करजगाव, कल्याणी, वरुड, देहड, मुर्तड, दानापुर, रेलगाव, मोहळाई, माळेगाव, कोळेगाव, कोसगाव आदी भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात.

आद्रकने केली सत्तरी पार
एकीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झालेली पहायला मिळाली. तर दुसरीकडे याच बाजारात आद्रकच्या भावाने माञ सत्तरी पार केल्याचे पहायला मिळाली. तरी देखील उत्तम दर्जाची आद्रक बाजारात उपलब्ध नव्हती. इतर भाज्यांचे दर आवाक्यात होते.

मातीमोल भाव मिळाला
भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा ठेवून शेतात कोथिंबीर लागवड केली होती. कोथिंबीर आता काढणीसाठी आली असल्याने बाजारात विक्रीसाठी आणली होती. परंतु तिला कुणी फुकट विचारायला तयार नसल्याने अखेर शेवटी मातीमोल भावात विकावी लागली. लावलेला खर्च देखील वसुल झाला नाही. - किशोर दळवी, भाजीपाला उत्पादक

बातम्या आणखी आहेत...