आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या हाती सत्ता:निकाल लागला २५४ ग्रामपंचायतींचा अन् विविध पक्ष म्हणतात ४०९ ठिकाणी पक्ष समर्थक जिंकले

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकूण ग्रामपंचायती
266

विजयी सरपंच
254

बिनविरोध सरपंच
17

विजयी सदस्य
2178

जिल्ह्यातील २५४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल मंगळवारी घोषित झाले. भाजपने १४४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस १०२, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) ६४ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) कडून ७३ ग्रामपंचायतींवर दावा केल्यामुळे ही संख्या ४०९ वर पोहोचली आहे. दाव्या-प्रतिदाव्यांची ही रणधुमाळी गावागावात पोहोचली असून विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला, तर पराभूत उमेदवार चिंतनावर भर देताना दिसले.

जिल्ह्यात बदनापूर वगळता सातही तालुक्यांचे निकाल दुपारी २ वाजेपर्यंत घोषित झाले. जालना शहरातील तहसील कार्यालय, भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालय, जाफराबादेत तहसील कार्यालय, परतूरमध्ये जवाहर नवोदय विद्यालय (आंबा), मंठ्यात तहसील कार्यालय, घनसावंगीत मुख्य इमारत, सीईओ हॉल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर अंबडला तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली.

या वेळी जसजशी नावांची घोषणा केली गेली, तसतसा विजयी उमेदवार व समर्थकांनी केंद्राच्या परिसरात जल्लोष केला, एकमेकांना पेढे भरवले. गुलाल, पुष्पगुच्छ, हार, पेढे अशी संपूर्ण तयारी केलेली असल्यामुळे मतमोजणी केंद्रांवर गुलाल अन् ढोल-ताशांच्या तालावर समर्थकांनी तुफान जल्लोष केला. विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढण्याचा मोहही अनेकांना आवरता आला नाही. दुसरीकडे, पराभूत उमेदवार व समर्थक आल्यापावली परत जात होते.

यामुळे कहीं खुशी-कहीं गम असे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळाले. ग्रामपंचायतींचे निकाल पाहण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दीला दूर सारत फक्त उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला.

यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत चालली तर बाहेरील गर्दीवरही नियंत्रण आले. प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्थेसह शांततेसाठी प्रयत्न केले असले तरी विजयी उमेदवार, समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोल-ताशांचा गजर केला. यामुळे पोलिसांना काही ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, सत्ता मिळाली आता आश्वासनपूर्तीचे आव्हान विजयी उमेदवारांपुढे असून नेमकी कोणती विकासकामे होणार आहेत, याकडे मतदारांचे लक्ष असणार आहे. तीन लाख मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे आव्हान : २ लाख ९९ हजार २३९ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात १ लाख ४० हजार ८३७ स्त्री, १ लाख ५८ हजार ४०१ पुरुष तर एका तृतीयपंथीयाचा समावेश होता. त्यामुळे या मतदारांचा विश्वास सार्थ करण्याचे आव्हान गावच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांवर असणार आहे.

जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष
२६६ ग्रामपंचायत निवडणुकीत १२ जागा बिनविरोध जिंकून भाजपने घेतलेली आघाडी मतमोजणीतही कायम ठेवली. तब्बल १४४ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व राखत क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा पक्षाने केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नेतृत्वात यश मिळवल्याचे पक्ष कार्यालयाने म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून १०२ ठिकाणी दावा
१४ ठिकाणी काँग्रेस तर महाविकास आघाडी नेतृत्वात ९७ ग्रामपंचायतीत विजयी झाल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांनी आपल्या पक्षाला १०२ ठिकाणी यश मिळाल्याचा दावा केला.

परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात भाजप अग्रस्थानी
परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील ८४ पैकी ६० ग्रामपंचायतीत भाजप विजयी झाल्याचा दावा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. परतूर तालुक्यात ४१ पैकी २९ तर मंठ्यात ३५ पैकी २६ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळवल्याचे सांगत हा विकासकामांचा, सर्वसामान्यांचा विजय असल्याचेही ते म्हणाले. परतूर तालुक्यातील आष्टी, लोणी, टाकळी रंगोपंत, हस्तूर तांडा, श्रीष्टी तांडा, श्रीष्टी पिंपळा, खांडवी, खांडवीवाडी, दैठणा बु., गोळेगाव, चांगतपुरी, फुलवाडी, पळशी, रायगव्हाण, आनंदगाव, वाढोना, यादलापूर, दहिफळ भोंगाने, आनंदवाडी, ब्रह्मवडगाव, रोहिना बु. कवजवळा, रोहिना खु., वरफळवाडी, सालगाव रेवलगाव तर मंठ्यातील कोकरंबा, जांभरुण, तुपा, वडगाव, सरहद, अंभोरा, शेळके वाडेगाव, पांढुर्णा, तळेगाव, दहा पोखरी आदी ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे.

चर्चेतील गावांचा निकाल
विरखेडा भालके- रेपाळा : जाफराबाद तालुक्यातील विरखेडा भालके- रेपाळा गटग्रामपंचायतीत सर्वात कमी म्हणजे २३ वर्ष वय असलेल्या गणेश सुभाष शेळके हे सरपंचपदी विजयी झाले.

लोणी खुर्द : माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या लोणी खुर्द गावात सरपंचपदी लोणीकरांचे पुतणे गजानन सुनिलराव यादव लोणीकर निवडून आले.

आष्टी : परतूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आष्टी ग्रामपंचायतीत भाजपाचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला. मागील पंचवार्षिकला कॉँग्रेसने याठिकाणी सत्ता स्थापन केली होती. यामुळे १७ सदस्य असलेली आष्टी काँग्रेसच्या हातून गेली.

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती दगडूबा गोरे यांचा झाला पराभव.
कोळेगाव : नानाभाऊ भागिले यांनी आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवत चौथ्यांदा विजय मिळविला.

बातम्या आणखी आहेत...