आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामान विभागामार्फत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासह तालुक्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण झाले असल्याने शेतकऱ्यावर चिंतेचे ढग पसरलेले दिसून येत आहे. सध्या काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला फाटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागील आठवड्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिके आडवी झाल्याची दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना सुलतानी व अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिकाची पेरणी व लागवड केल्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर सोयाबीन, मूग, उडीद व कपासावर विविध रोगराईचे संकट उभे राहिले होते. तसेच शेतीमालाचे अपेक्षित भाव वाढत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.
खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची रब्बी हंगामावर मोठे अपेक्षा होती. परंतु, त्यात आता रब्बी हंगामात देखील काढणीच्या वेळीच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकटाचे ढग आलेले दिसून येत आहे. तालुक्यामध्ये गेल्या महिन्यापासून रब्बी हंगामातील पिके काढणीला वेग आला आहे.अतिवृष्टीमुळे उशिरा पेरणी झालेली रब्बी हंगामातील पिके सध्या काढलेला आलेली आहेत. तालुक्यात गहू, ज्वारी व हरभरा यासह अन्य पिकाची काढणी व मळणी करण्या शेतकरी व्यस्त आहेत. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून तालुक्यात ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील आठवड्यामध्ये रिमझिम पाऊस झाला यात उभी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना आता हार्वेस्टर यंत्राचा वापर न करता हाताने काढणी व मळणी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात पुन्हा आता अवकाळी पावसाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्यामध्ये सर्व शेतातील कामे एकाच वेळी आल्याने शेतमजुराची टंचाई देखील जाणवत असल्याचे गेवराई येथील शेतकरी सांगत आहेत.
मजुरीचे दर वाढले
रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकाची शेतमजुरांना २५० ते ३०० रूपये मजुरी द्यावी लागत आहे. किंवा काढणीच्या मोबदल्यात धान्यही देण्यात येते. तसेच मळणी यंत्रातून गहू व हरभरा तयार करण्याकरिता एक पायली अशी मजुरी द्यावी लागत आहे.त्याचबरोबर ज्वारी काढणी व मळणी करण्याकरिता होणाऱ्या धान्यातील आठवा हिस्सा द्यावा लागत असल्याचे गेवराई येथील शरद खरात यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.