आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाचे सूप:राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव घेत साहित्य संमेलनाचे सूप वाजले

महेश कुलकर्णी / प्रताप गाढे | महदंबानगरी (घनसावंगी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासह शेती, साहित्य, दळणवळण, पाणीप्रश्न या प्रश्नांवर भर देणारे १३ ठराव घेत ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे सूप वाजले. घनसावंगी येथे संत रामदास महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे दोनदिवसीय मराठवाडा साहित्य संमेलन घेण्यात आले. रविवारी सायंकाळी या संमेलनाचा समारोप झाला.

संमेलनाचा समारोप प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. या वेळी ते म्हणाले, ग्रामस्थांनी शाळा आधी बांधावी, मग मंदिर, त्यानंतर सप्ताह करावा. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार नारायणराव मुंढे, विलासराव खरात, ऋषिकेश कांबळे, डॉ. संजीवनी तडेगावकर आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मराठी जनतेची प्रेरणास्थाने आणि श्रद्धास्थानेही आहेत. अशा बहुजन, परिवर्तनवादी अस्मितांचा अवमान मराठी माणूस कदापि सहन करू शकत नाही.

मात्र या महापुरुषांबद्दल अनैतिहासिक आणि अवास्तव शेरेबाजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत करीत आहेत. त्याबद्दल त्यांच्या निषेधाचा ठराव प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी मांडला. त्यास देविदास फुलारी यांनी अनुमोदन दिले. शेतीमालाला हमीभाव मिळावा. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत सरकारने हमी द्यावी. मराठवाडा रेल्वेमार्गाचा दक्षिण मध्य रेल्वे विभागातून मध्य रेल्वेत समारोप करण्यात यावा.

घनसावंगी येथे वातानुकूलित नाट्यगृह व्हावे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी रामसगाव येथे महदंबेचे भव्य स्मारक व्हावे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे हक्काचे २२ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यात यावे. जालना जिल्ह्याला मोसंबी हब म्हणून जाहीर करावे, महामंडळावर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची, अभ्यासकांची तसेच त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक करावी, लोकप्रतिनिधी मतदाराचा विश्वासघात करून पक्षांतर करतात. अशा लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा त्यांचा हा अधिकार मान्य करणारा कायदा करण्याच्या मागणीचा ठराव मांडण्यात अाला.

सत्तेच्या विरोधात लेखक, साहित्यिकांनी लढण्याची ताकद ठेवावी
राज्यात काेणाचीही सत्ता असो, ते मात्र मराठवाड्याकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद लेखक, साहित्यिकांनी ठेवली पाहिजे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असलो तरी मराठवाड्यात शिक्षण, आरोग्याची किती दुर्दशा आहे. त्यावर कुणीच बोलायला तयार नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. अनेक गावांत मंदिर बांधकाम, हरिनाम सप्ताहासाठी ग्रामस्थ पैसे खर्च करतात, गावातून वर्गणी गोळा करतात. परंतु गावातील शाळा, शाळा खोल्या दुरुस्तीसाठी, शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मात्र देत नाहीत. सप्ताह, मंदिर याला विरोध नाही, तर शाळा आधी बांधावी, मग मंदिर, त्यानंतर सप्ताह करावा, असे परखड मत प्रा. डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...