आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबड्या इंग्रजी शाळांत आरटीई कोट्यातून प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची फीस संबंधित शाळांना शासनाकडून प्राप्त होते. सरासरी १७ हजार रुपयांपर्यंत रक्कम वर्गनिहाय दिली जाते. या प्रक्रियेत आता विद्यार्थ्यांचे आधार सरलच्या माध्यमातून जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी दाखवा अन् प्रतिपूर्ती रक्कम मिळवा, असे धोरण लागू केले आहे. यामुळे आता शाळांना बोगस विद्यार्थी दाखवत शासनाचे अनुदान लुटता येणार नाही.
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील (आरटीई) विद्यार्थ्यांच्या २५ टक्के कोट्यातील शाळा प्रवेशाचे शुल्क खासगी शाळांना देण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ टक्के कोट्यातील या वर्षातील शाळांच्या शुल्काचा परतावा करण्यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार शाळेच्या शैक्षणिक शुल्काची तपासणी केल्यानंतर शाळेच्या शुल्काचे ऑडिट झाले की नाही, याची खातरजमा करण्यात येणार आहे.
त्यानंतर शाळांना ही रक्कम मिळणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकासोबतच इयत्ता पहिली ते आठवीच्या शुल्काचा तपशील सरल पोर्टलवर जाहीर असणे आवश्यक आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. शुल्क देण्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी स्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासणी समित्या पथके गठित करण्याची सूचना करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक वर्गात जाऊन आरटीईमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचेही प्रयोजन आहे. दरम्यान, आता शाळांना बोगस विद्यार्थी दाखवत शासनाचे अनुदान लुटता येणार नाही. याला आता आळा बसणार आहे.
खातरजमा केली जाणार
जिल्ह्यात आरटीई कोट्यातून देण्यात येणाऱ्या प्रवेशांची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून मागवण्यात आली आहे. आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, त्यांची या माध्यमातून खातरजमा होणार आहे. सध्या माहिती संकलनाची कार्यवाही सुरू आहे. -कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. जालना
अशी मागितली माहिती
आरटीई कोट्यातून एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या इयत्ता पहिली ते आठवी, यापैकी सरलमध्ये नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, सरल प्रणालीत आधार लिंक प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, आधार प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अशी सविस्तर माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प समन्वयकांनी मागवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.