आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पानशेंद्रा येथे प्रस्तावित सीड पार्क येत्या डिसेंबरअखेर सुरू होणार असून याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. तत्कालीन सरकारने २०१४ मध्ये सीड पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला असून यासाठी पानशेंद्रा येथे ७५ एकर जमीनदेखील उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी सीड पार्कची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांना माती परिक्षण, चांगल्या प्रतीचे बियाणे, उगवण क्षमता, उत्पादन क्षमता वाढीसह अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र, प्रकल्प उभारण्याची घोषणा होऊन ८ वर्षे झाली तरीही सीड पार्क सुरू झाला नसल्याचे आमदार चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रश्नावर उत्तर देताना कृषी मंत्री सत्तार यांनी सीड पार्क उभारणी संदर्भात बियाणे उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा तसेच या प्रकल्पामध्ये सहभाग घेणाऱ्या सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बियाणे उद्योजकांच्या गरजा निश्चित करून डी.पी.आर.तयार करण्यात आला आहे. सीड पार्क प्रकल्प विकसित करण्यास निधी मिळण्याबाबत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र केंद्र शासनाच्या निधीची वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून हा सीड पार्क प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी आग्रही मागणी आमदार चव्हाण यांनी सभागृहात केली.
युती सरकारकडून १०९ कोटींची गुंतवणूक युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात सीडस् पार्कची घोषणा केल्यानंतर सरकारकडून १०९.३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा जीआरही निघाला होता. मात्र, भुसंपादन, भूखंड पाडणे व डीपीआर तयार करण्यातच सात वर्षे गेली. सरकारकडून निधीसह मंजुरी मिळाल्यावरच प्रकल्पाचे काम सुरु होईल, असे संबंधित यंत्रणांकडून सांगितले जात आहे. विधिमंडळात कृषिमंत्र्यांनीही निधीचा प्रस्ताव केंद्राला सादर केल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.