आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती स्थापन:पार्थिव गणेशमूर्ती स्थापन करण्याची देशपांडे घराण्याची परंपरा

महेश देशपांडे | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो वर्षाची पूर्वापार परंपरा कायम ठेवत भोकरदन येथे देशपांडे घराण्यातील गणपती गल्लीत राहणारे गणेश नारायणराव देशपांडे यांनी स्वहस्ते पर्यावरण पूरक, मातीची पार्थिव गणेश मूर्ती करून त्याची स्थापना केली. विशेष म्हणजे यावर्षीही त्यांनी परंपरेप्रमाणे दैनिक दिव्य मराठीने आवाहन केल्याप्रमाणे पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्ती तयार केली. मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी मीनल देशपांडे व मुलांचे सहकार्य लाभले.

भोकरदनकर देशपांडे घराण्याचे कुलदैवत हे राजुरेश्वर महागणपती आहे. वर्षभरातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सर्व कुटुंब भोकरदन येथे आपल्या घरी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. प्रथा आणि परंपरेप्रमाणे भोकरदनकर देशपांडे घराण्यात पहिल्यापासूनच स्व हस्ते तयार केलेली मातीची पार्थिव गणेश मूर्ती स्थापना करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही देशपांडे घराण्यात जपण्यात येते. गणेश देशपांडे यांचे आजोबा व वडील नारायणराव यशवंतराव देशपांडे, मोरेश्वर मुकुंदराव देशपांडे हे भोकरदन येथील खेळणा नदीच्या दरडीची माती आणून ती बारीक वस्त्रगाळ करून पाण्याने भिजवत व त्यात कापूस मिसळून त्या मातीचा लगदा तयार करून त्याला आकार देत. त्यापासून भरीव व रेखीव अशी श्री गणपतीची सुबक मूर्ती तयार करतात.

हीच परंपरा गणेश देशपांडे यांनी आजही कायम ठेवलेली आहे. यावर्षीही त्यांनी घरीच गणपतीची मूर्ती बनवून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.विशेष म्हणजे पर्यावरणाचे महत्त्व ओळखून दिव्य मराठीने पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी मातीची गणेश मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करून अभियान सुरू केले. आमच्या या परंपरेला प्रेरणा व एकप्रकारे मान्यताच मिळाली,असे देशपांडे म्हणतात. दरम्यान, मागील दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले. आता निर्बंध हटवल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

शेकडो वर्षांपासूनची परंपरा अव्याहतपणे सुरू
आमच्या देशपांडे घराण्यात सर्वांच्याच घरी पहिल्यांदा मातीच्या पार्थिव गणेश मूर्तीच तयार केल्या जात होत्या व ही परंपरा सर्वजण पाळतही होते. मात्र, बदलत्या काळात ज्यांना हे शक्य होत नाही ते नवीन आयत्या तयार गणेश मूर्ती घेऊन त्याची स्थापना करतात. मात्र, आम्ही आजही प्रथा परंपरेप्रमाणे मातीची पार्थिव गणेश मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करतो, असे गणेश देशपांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...