आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जातिवाचक उल्लेखाच्या गावांना आता महापुरुषांची नावे; जिल्हा परिषद व नगरपंचायतीकडून ठराव मागवल्यावर होणार नावावर शिक्कामोर्तब

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभागीय आयुक्तांनी बोलावली सोमवारी कार्यालयात बैठक

जातिवाचक उल्लेख असलेली गावे, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व नगरपालिकेकडून यादी मागवण्यात आली आहे. यासंदर्भात २१ जून रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बैठक घेऊन संबंधित यंत्रणेला याबाबत सूचना केल्या. तसेच येत्या २८ जून रोजी औरंगाबादेत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात प्राप्त निर्देशानुसार जिल्हास्तरीय यंत्रणेला काम करावे लागणार असून त्याची पूर्वतयारीही सुरू झाली आहे. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने गावे, वस्त्या व रस्त्यांची नावे बदलून जातिवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यास २ डिसेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.

यात नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शहरी भागासाठी नगरविकास, तर ग्रामीण भागासाठी ग्रामविकास विभागाने निश्चित करून जातिवाचक नावे बदलण्याची कार्यवाही करायची आहे. हा निर्णय महत्त्वाकांक्षी व राज्याच्या सामाजिक सलोख्यावर सकारात्मक परिणाम करणारा असल्याने याची अंमलबजावणी तातडीने करण्याची आवश्यक आहे. यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ८ जणांची समिती गठित करण्यात आली आहे. यात सहायक अायुक्त हे सदस्य सचिव असून इतर विभागाचे अधिकारी सदस्य आहेत. दरम्यान, २१ जून रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बैठक घेऊन नावे बदलण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. यासोबतच जिल्ह्यात जातिवाचक नावे असलेल्या गाव, वस्त्या व रस्त्यांची यादीही मागवली आहे.

पालिका, ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक
जातिवाचक नाव असलेले गाव, वस्ती व रस्त्यांचे नाव बदलून घेण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तर शहरी भागात नगरपालिकेकडून ठराव संमत करून तसा प्रस्ताव मागवण्यात येणार आहे. तत्पूर्वी जातिवाचक नावे असलेली गावे, वस्त्या व रस्ते किती व कोणते याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आहेत. ही यादी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. अमित घवले, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, जालना

विभागीय आयुक्तांनी बोलावली सोमवारी कार्यालयात बैठक
जिल्हास्तरावर नाव बदलण्यासाठी नेमकी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात आली यासह विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी २८ जून रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होत आहे. यात ठरल्याप्रमाणे नावे बदलण्यासंदर्भात प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...