आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा दहावीची:अफवांना फुटले पेव,यंत्रणेची धावपळ; संशयित केंद्रांवर एकऐवजी दोन पथके

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जालना जिल्ह्यात इंग्रजी विषयाच्या पेपरला एकही विद्यार्थी रस्टिकेट नाही

जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर झाला. मागील दोन पेपरला कॉपी करण्याच्या प्रकरणाची काही केंद्रांवर ओरड झाली होती. शिक्षण विभागाने या बाबीची तत्काळ दखल घेतली आहे. कॉपी प्रकारात संशय असलेल्या केंद्रांवर बैठे पथक एकऐवजी दोन देण्यात आले आहे. दरम्यान, कॉपी करण्याचे तसेच गैरप्रकाराबाबत काही केंद्रांवर केवळ अफवा होत असल्याने यंत्रणेची मोठी धावपळ होत आहे. शनिवारी इंग्रजीच्या पेपरला एकही कॉपीबहाद्दर आढळून आला नाही. यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला १५ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील एकूण ३६८ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. यासाठी एकूण ३० हजार ४८६ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.

दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर रनर हे बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. शिवाय भरारी पथकेही आहेत. विद्यार्थ्यांना सतत लिखाण तसेच बैठकीचा सराव नसल्याने परीक्षेसाठी वाढीव वेळही देण्यात आला आहे. असे असताना पहिल्या तसेच दुसऱ्या पेपरला काही ठिकाणी कॉपी तसेच गैरप्रकार करण्याची बाब शिक्षण विभागाकडे आली होती. याची दखल घेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित परीक्षा केंद्रावर भेटी देत घडलेल्या प्रकाराची चौकशी लावली आहे, तर ज्या ठिकाणी गैरप्रकाराची शक्यता होती अशा ठिकाणी एकऐवजी दोन पथके तैनात केली आहेत. या नियोजनात प्रशासनाची मोठी धावपळ होत आहे. शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यातील ३६९ केंद्रांवर पार पडला. एकही विद्यार्थी रस्टिकेट झाला नाही. या पेपरसाठी २८ हजार ७५५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २८ हजार ११३ विद्यार्थी उपस्थित, तर ६४२ विद्यार्थी अनुपस्थित असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या भेटी
इंग्रजी विषयाच्या पेपरच्या नियंत्रणासाठी स्वतः जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः शहरातील काही शाळांना भेटी दिल्या, तर त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी नेमून दिलेल्या केंद्रांना भेटी दिल्या. ३६८ जिल्हा पंचायत समितीचे विविध कर्मचारी केंद्रप्रमुख व अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांनी भेटी देऊन परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. यापूर्वी तक्रार झालेल्या भोकरदन तालुक्यातील गोषेगाव व मंठा तालुक्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचेही परीक्षेवर नियंत्रण होते.

आकडेवारी अशी
जिल्ह्यातील एकूण ३६८ केंद्रे
३० हजार ४८६ विद्यार्थी प्रवेशित
२८ हजार ११३ विद्यार्थ्यांनी दिली इंग्रजीचा पेपर
०४ विद्यार्थी आजपर्यंत रस्टिकेट

केद्रांवर प्रत्यक्ष पाहणी सुरू, माध्यमिक विभाग सतर्क
काही केंद्रांबाबत जी ओरड निर्माण झाली होती त्या बाबींची पाहणी माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, असे असताना संशयित केंद्रांना यातून सूट दिली नाही. गैरप्रकार एकाही केंद्रावर होणार नाही यासाठी माध्यमिक विभाग सतर्क आहे. जाणीवपूर्वक काही केंद्रांबाबत अफवा पसरल्याने यंत्रणेचीही धावपळ होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचेही यामुळे नुकसान होते. मंगल धुपे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जालना

गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर दोन पथके
जिल्ह्यात या वेळी सर्वच शाळा या उपकेंद्र म्हणून जाहीर केल्या असल्याने नियोजनासाठी मनुष्यबळ वाढले आहे. यातच काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची ओरड लक्षात घेता याची पडताळणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. अशा केंद्रांवर तब्बल दोन बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार होणार नाही यासाठी बैठ्या पथकाबरोबर भरारी पथकाची करडी नजर आहे.

बातम्या आणखी आहेत...