आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲड. किरण लोखंडे खून प्रकरणाचा उलगडा:मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे पत्नीने पतीचा केला खून

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाविरुद्ध लग्न लावून दिल्याने दोन जणांच्या मदतीने पत्नीनेच ॲड. किरण लोखंडे यांचा काटा काढल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी व तिचा एक साथीदार या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अर्चनानगर भागात भाड्याच्या खाेलीत राहणाऱ्या ॲड. किरण लोखंडे (२३, खासगाव, ता. जाफराबाद) यांचा मृतदेह आढळून आला होता. गॅसच्या स्फोटाने हा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची तक्रारही ॲड. लोखंडे यांच्या पत्नीने दिली होती. दरम्यान, या घटनेनंतर हा घातपात असावा, असा संशय वकील संघाने निवेदन देऊन व्यक्त केला होता. या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात मृताच्या पत्नीची चौकशी केली असता चौकशीदरम्यान अनेक प्रश्न उपस्थित होताच पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता पत्नीनेच दोन जणांच्या मदतीने ॲड. लोखंडे यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. मृताची पत्नी, गणेश पिंटू आगलावे (२३, वाल्हा, ता. बदनापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अजून एक जण फरार आहे. दरम्यान, मृत किरण लोखंडे खून प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये असा निर्णय जिल्हा वकील संघाने घेतला आहे. सर्व वकिलांना याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून कोणी वकीलपत्र घेत असेल तर त्यांनाही हजर न होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...