आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:रात्री चोरट्यांनी लांबवला साडेचार लाखांचा मुद्देमाल; चाकूचा धाक दाखवत शहरातील महसूल कॉलनीत चोरट्यांचा धुडगूस

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने, सात फुटांची शिडी आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. जालना शहरातील महसूल कॉलनी येथे सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रामेश्वर ताकट यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ताकट हे सोमवारी रात्री आपल्या पत्नी व मुलीसह बेडरूममध्ये झोपले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी चॅनल गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला.

लोखंडी टॉमीने बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये प्रवेश करत चोरट्यांनी घरातील सर्व किमती ऐवज देऊन टाका, असे म्हणत ताकट यांना धमकावले. नंतर चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून सामान अस्ताव्यस्त फेकले. कपाटातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे गंठण, ५० हजार रुपये किमतीचा लक्ष्मीहार, ३० हजार रुपये किमतीचे कानातील मिनी गंठण यासह १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी काढून घेतली.

आश्चर्य म्हणजे चोरट्यांनी सात फूट लांबीची फोल्डेबल शिडी आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआरही पळवून नेले. रामेश्वर ताकट यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि संभाजी वडते यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...