आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तृत्ववानांचा गौरव:इतरांचा जीवन जगण्याचा विचार करणे हीच माणुसकी

भोकरदन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. त्याचप्रमाणे स्वतः सुखवस्तू जीवन जगत असताना इतरांच्या जीवन जगण्यांचा जे विचार करतात तीच खरी माणुसकी आहे. समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाचे आयुष्यभर समाधान लागते, असे प्रतिपादन मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

भोकरदन येथे ॲड. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी. जी. पवार, महाराष्ट्र गाेवा बार कॉन्सीलचे ॲड. व्ही. डी. सोळंके, उद्योजक शेख सादिक अहेमद, ऋतुजा देशपांडे, ॲड. हर्षकुमार जाधव, ॲड. विरेंद्र देशमुख , नारायणराव जिवरख, विलास शिंदे, फैसल चाऊस यांची उपस्थिती होती. अनासपुरे म्हणाले, विचार माणसाला घडवतो व बिघडवतो त्यासाठी नेहमी माणसाने चांगल्याच कामाचा विचार करावा.

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नदी पुनर्जीवन , तलावातील गाळ काढणे आदी कामातून विविध गावात समाज उपयोगी काम केलेले आहे. भोकरदन येथील मित्र मंडळ ही आता आमच्या नाम फाउंडेशनची जोडले गेले आहे समाजातील संकटग्रस्त कुटुंबांना नेहमी मदतीचा चालूच राहिला पाहिजे. त्याचप्रमाणे समाजात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचाही आपण गौरव केलाच पाहिजे. चांगले काम केल्याने माणसाला आयुष्यभर समाधान लाभते.

बीड मधील एका शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करण्यापासून रोखले त्याच्याशी संवाद साधून त्याच्या संकटाची सोडवणूक करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले त्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत ही पुरविली आज त्या शेतकऱ्याची मुलगी एमबीबीएस डॉक्टर झालेली आहे असे उदाहरणही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी दिले. प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष ॲड हर्षकुमार जाधव यांनी मित्र मंडळ राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, आदर्श शिक्षण संस्थाचालक, आदर्श शिक्षक, प्रगतिशील शेतकरी, पत्रकार, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, आदर्श नगराध्यक्ष यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन नारायण जिवरख यांनी तर संजय शास्त्री यांनी आभार मानले. यावेळी विलास शिंदे, जयंत जोशी, विश्वास जाधव, मुकुंदराव इंगळे, तरुण पानसरिया, सुहास जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादूसिंग डोभाळ, योगेश शर्मा, गणेशराव रोकडे, डॉ. ओमप्रकाश गोधा, सरपंच रामसिंग डोभाळ, नगराध्यक्षा सुरेखा लहाने, संजय लहाने, कदिरबापु शब्बीर कुरेशी, नसीम पठाण, हमदू चाऊस, संजय पारख, विकास जाधव, संतोष देशपांडे, वाघ, देठे, अॅड. गणेश ठोंबरे यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

मिरगे कुटुंबातील मुलांची शिक्षणाची जबाबदारी
जिजाबाई नामदेव मिरगे राहणार वरुड पिंपरी तालुका सिल्लोड या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला नाम फाउंडेशनच्या वतीने मकरंद अनासपुरे यांनी एक लाख रुपये व त्याप्रमाणे भोकरदन येथील दानशूर व्यक्ती व संस्थेच्या वतीने एक लाख रुपये अशी रोख मदत तसेच त्या कुटुंबातील दोन लहान मुलांची पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी नाम फाउंडेशनने घेतली.

१८ विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप
मित्र मंडळाच्या वतीने भोकरदन शहरातील व तालुक्यातील १८ विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी एक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील शहीद जवानांच्या सात कुटुंबातील विधवा, वीर पत्नींना व मातांना मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश व शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करून देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...