आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची रांग:यंदा नवरात्रोत्सव उत्साहात; मंठ्यात रेणुकामाता दर्शनास भाविकांची रांग

प्रदीप देशमुख | मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याचे आराध्य दैवत आणि माहूरचे ठाणे म्हणून मंठा पंचक्रोशीत रेणुका माता मंदिराची ख्याती आहे. शहरापासून उत्तरेस उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थानात वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रात नऊ दिवस मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या काळात राज्याच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.

़नयनरम्य परिसर लाभलेले रेणुकामाता देवस्थान सध्या भक्तांनी अक्षरश: फुलून गेले आहे. पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी रीघ लावताना दिसत आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे नवरात्र उत्सवावर विरजण पडले होते. परंतु यावर्षी मात्र नवरात्रोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. रेणुका देवीचे मूळ मंदिर चूना आणि विटा वापरून बांधलेले आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करताना मूळ मंदिरात कोणताही बदल न करता, भाविकांच्या देणगीतून मंदिरासमोर भव्य मंडप बांधण्यात आलेला आहे.

तीर्थक्षेत्र पर्यटन अंतर्गत देवस्थानाचा समावेश असल्यामुळे मंदिर परिसरात दोन सभागृहे , अंतर्गत सिमेंट रस्ते, संरक्षक भिंत यासारखी विकास कामे करण्यात आलेली आहेत. देवीचा डोंगर चढताना पायथ्याला गणपतीचे आणि अनुसया मातेचे मंदिर आहे. रेणुका देवीची निस्सीम भक्त असलेल्या जिजामातेचे मंदिर देवीच्या अगदी समोर आहे. देवीच्या अगोदर जिजामातेचे दर्शन घेण्याची पूर्वापार प्रथा आहे. देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवी माळावर अनेक नवसिक भक्त नऊ दिवस धरणे बसतात. महिला भक्त परड्या घेऊन मंदिरात बसतात.

नवसिक भाविक देवीच्या प्रत्येक पायऱ्यावर दिवे लावतात, नारळे फोडतात. या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. देवीची महापूजा, वस्त्रालंकार, फुलांची आरास, दोन वेळा आरती, सप्तशतीचे पाठ, देवी भागवत, देवीची पदे असे धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. अष्टमीच्या रात्री छबिना मिरवणूक काढून देवी मंदिराच्या भोवती भोत नाचवत प्रदक्षिणा घातल्या जातात. नवमीच्या पहाटे होमहवन करुन पूर्णाहुती दिली जाते. देवीचा माळ चढून जाणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्था आणि दानशूर व्यक्तीकडून फराळाची आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि डॉ.संजय रोडगे यांच्यावतीने देवी भक्तांसाठी सेलू ते मंठा मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवी माळाच्या पायथ्याला बच्चे कंपनीसाठी रहाट पाळणे, ब्रेक डान्स, मिकी माऊस, रेल्वेगाडी, बोटिंग यासारखे खेळ उपलब्ध आहेत. बच्चेकंपनी सोबतच मोठी मंडळी सुद्धा खेळ आणि खाण्यापिण्याची मौज करताना दिसत आहेत. मंदिर परिसरात प्रसादाची, फुलांची, सौंदर्यप्रसाधने, हॉटेल, खेळणीची दुकाने थाटली आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे छोट्या व्यावसायिकांना चांगला लाभ होत असून त्यांची विक्री वाढली आहे.

नगरपंचायतच्या वतीने अग्निशामक बंब, घंटागाडी, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आस्मान शिंदे आणि बलभीम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती पाहून महिला पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. एकूणच सध्या देवीमाळावर नवरात्रीची धामधूम पाहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...