आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचा कानाडोळा:गतवर्षात तिघांचा मृत्यू, नदीत मातीचा ढीग; रोहनवाडी पूल प्रशासनाच्या दुर्लक्षाचे मॉडेल

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुलाचे काम न झाल्याने 24 गावांचा ये-जा करण्याचा प्रश्न अजूनही ऐरणीवर

अंबड बायपास मार्गावरील रोहनवाडी पुलाचे काम न झाल्यामुळे गतवर्षी पावसाने आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची या पुलाकडे दुर्लक्ष आहे. पुलाचे काम होण्यासाठी रासपचे ओमप्रकाश चितळकर यांनी वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता याच ठिकाणी सांडपाण्याचा प्रकल्प होत असल्यामुळे खोदकामाच्या मातीचा ढीग नदीतच पडून आहे. मातीच्या ढिगाने पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळा असून शहरात पाणी घुसण्याचा धोका आहे. दरवर्षी पुराच्या पाण्यात वाहून अनेकांचे बळी जात असतानाही या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.

घनसावंगीकडून ये-जा करणाऱ्या २४ गावांतील ग्रामस्थांना या वर्षीही धोक्यात जीव घालून या पुलावरून मार्गक्रमण करावे लागणार. दरवर्षी या पुलावरून पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून जात असल्याचे दिसत असतानाही नदीतच मातीचा ढीग टाकला आहे. नवीन रस्ताही रखडला असून हा पूल प्रशासनाच्या दुर्लक्षाचे हे ‘मॉडेल’च ठरत आहे.

अंबड बायपास मार्गावरील रोहनवाडी पुलावरून पलीकडच्या बाजूने असलेल्या काही शाळांमध्ये जालना शहरातील विद्यार्थ्यांची ये-जा असते. तसेच या पुलावरूनच रोहनवाडी यासह घनसावंगीकडे जाण्यासाठीही हा मुख्य मार्ग असल्यामुळे या परिसरातील अनेक खेडेगावांतील ग्रामस्थांचीही जालन्यात ये-जा करण्यासाठी याच पुलावरून यावे लागते. परंतु, या पुलाचे मागील अनेक वर्षांपासून काम रखडले आहे. जुन्या पुलाची उंची कमी असल्यामुळे कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर पाणी ओसरेपर्यंत या पुलावरून ये-जा करता येत नाही. परंतु, कुणी जालन्यात अथवा रोहनवाडीकडे असल्यास घरी जाण्यासाठी पूर असला तरी अनेक जण या पुलावरून निघण्याचा प्रयत्न करतात. यातूनच दुर्दैवी घटना घडते. गतवर्षी या पुलावर तीन जणांचा वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. परंतु, यानंतरही जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने हा पूल केला नाही.

आता पावसाळा सुरू झाला असून गतवर्षीप्रमाणेच पुन्हा नागरिकांना अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी हा रस्ता जागतिक बँकेच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या पुलाची काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. परंतु, दुसरीकडे पावसाने पूर आला की अनेकांना अडकून पडावे लागते. पूर मोठा आल्या चार-चार दिवस या पुलावरून वाहतूक होत नाही. गतवर्षी मोठ्या दुर्घटना घडूनही जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. आता तर सांडपाणी असलेल्या प्रकल्पाची मातीचा ढीगही याच ठिकाणी असल्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यासही अडथळा निर्माण झाला आहे.

आंदोलन केले; प्रशासनाकडून दुर्लक्ष, आता पुलासाठी रस्ता तयार केला
नागरी समस्या असल्यामुळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांनी काम केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु, पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम होणे गरजेचे होते. आता पुलासाठी रस्ता तयार करण्यात आला. परंतु ना खडी अंथरली ना डांबरीकरण केले. गतवर्षी तीन जणांचा मृत्यू होऊनही प्रशासनाला जाग येत नसेल तर आता काय करावे, असा प्रश्न पडला असल्याची माहिती आंदोलन करणारे रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी दिली.

पोलिसांना लावावा लागतो बंदोबस्त
पूर आल्यास कुणी ये-जा करू नये म्हणून तालुका ठाण्याच्या पोलिसांना या पुलासाठी बंदोबस्त लावावा लागतो. पूर असताना गतवर्षी दोन्ही बाजूंनी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला आहे. ठाण्यातही मनुष्यबळाची अगोदरच कमतरता आहे. त्यातच पूर आल्यानंतर या ठिकाणी दोन पोलिसांना नियुक्त करावे लागते.

या प्रकरणाची माहिती घेतो
सांडपाण्याच्या प्रकल्पाची माती नदीत टाकण्याच्या प्रकरणात माहिती घेतो. पुराचा धोका असेल तर ती माती उचलण्याचे तत्काळ आदेश देतो.
संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, न.प., जालना.