आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातपाताचा संशय:मोटारसायकलला बांधून चारशे मीटर फरपटत ओढले, झाडाला बांधून केली मारहाण, विहिरीत टाकला मृतदेह

बदनापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत
  • बदनापूर तालुक्यातील कुंभारी शिवारातील प्रकार

तालुक्यातील कुंभारी शिवारातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु, नातेवाइकांनी गंभीर आरोप केले आहेत. विद्युत पंप चोरी केल्याच्या संशयावरून चार युवकांनी मोटारसायकलला बांधून चारशे मीटर फरपटत नेले. झाडाला बांधून बेदम मारहाण केली. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला.

शिवाजी बाबासाहेब पितळे (डोंगरगाव सायगाव, ता. बदनापूर) असे या प्रकरणातील मृत युवकाचे नाव आहे. कुंभारी शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, शिवाजी याचा घातपात केल्याचा आरोप करून नातेवाइकांनी मृतास ताब्यात घेण्यास नकार दिल्याने दोन तास तणाव होता. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव सायगाव येथील शिवाजी बाबासाहेब पितळे हा मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा पाहुण्यांकडे शोध घेण्यात येत होता. दरम्यान, शनिवारी कुंभारी शिवारातील भागवत बाबासाहेब बिडे यांच्या शेतातील पडीक विहिरीत तो मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोेलिस हेड कॉन्स्टेबल बुनगे हे करीत आहेत.

दोन तास तणाव
आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाइकांनी केली. जोवर आरोपींना अटक करत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. दोन तास टाळाटाळ सुरू होती. शेवटी भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे यांनी मध्यस्थी केली.

चौकशी करतो आहे
युवकाचा संशयास्पद मृत्यू आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. नातेवाइकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, असे बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

खून झाल्याचा आरोप
२९ जून रोजी गावातील चार तरुणांनी एकत्र येऊन शिवाजी पितळे या युवकास मोटारसायकलला बांधून फरपटत फिल्मीस्टाइल आणले. नंतर झाडाला बांधून जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नंतर भीतीपोटी मृतदेह विहिरीमध्ये टाकला असा आरोप नातेवाइकांनी केला. या घटनेमुळे मृत युवकाचा एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे, रामनारायण कोल्हे आणि नातेवाइकांच्या वतीने करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...