आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कार:संस्कृती, धर्म  अन् राष्ट्र टिकवण्यासाठी बालवयात मुलांवर योग्य संस्कार करा

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. आपली संस्कृती, धर्म व राष्ट्र टिकवण्यासाठी तसेच देशात विचारवंत, थोर व्यक्ती, समाजसुधारक घडवण्यासाठी संस्काराशिवाय पर्याय नाही. बालवयातच आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी श्रीस्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून आपल्या बालकांवर योग्य संस्कार देण्याचे आवाहन चंद्रकांतदादा मोरे यांनी केले.

जालना गणेश फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हितगुज करताना ते बोलत होते. या वेळी गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष भास्कर दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर, संजय खोतकर, फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे, दिनेश फलके, अशोक पांगारकर, रवींद्र तौर, राजेंद्र राख, राजेश राऊत, साईनाथ पवार, अभिमन्यू खोतकर, संजय देठे, किरण गरड, धनराज काबलिये, प्रकाश जायभाये आदींची उपस्थिती होती. चंद्रकांतदादा मोरे म्हणाले, बालगुन्हेगारी आणि व्यसनाधीनता या दोन समस्या जगापुढे चिंतेचे विषय आहेत. आजची पिढी ही व्यसनांच्या आहारी गेलेली पाहावयास मिळत आहे. मुलांवर बालवयातच आध्यात्मिक संस्कार झाल्यास ही पिढी चुकीच्या दिशेने जाणार नाही. श्रीस्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून बालमनावर अत्युच्च व योग्य असे संस्कार केले जातात. या संस्काराच्या माध्यमातूनच एक आदर्श पिढी घडण्यास मदत होत असल्याने प्रत्येकाने आपल्या बालकांवर श्रीस्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून संस्कार देण्याचे आवाहन केले.

मानवी दु:ख दूर करून मानवाचा उत्तम पद्धतीने विकास व्हावा तसेच त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्याचे काम दिंडोरीप्रणीत श्रीस्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून गेल्या ७५ वर्षांपासून अविरतपणे करण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांना सामाजिक, प्रापंचिक, आध्यात्मिक बाबींवर मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण आणि संशोधन करण्यासाठीच सेवा मार्गाची स्थापना झाली आहे. जातपात, धर्म, स्त्री, पुरुष असा कुठलाही भेदभाव न बाळगता केवळ जनकल्याणाचे काम राज्यातील सात हजार श्रीस्वामी समर्थ केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजघडीला १५ कोटींपेक्षा अधिक सेवेकरी स्वामीमार्गामध्ये कार्यरत आहेत. २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाजकारण या सूत्रीचा वापर करत हे कार्य करण्यात येत असून या स्वामीकार्याची महती केवळ महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित न राहता इतर राज्यांसह सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क, नेपाळ यासह इतर देशांमध्ये स्वामीकार्य पोहोचले आहे, असे सांगितले.

या वेळी स्वामी समर्थ मार्गाचे सेवेकरी विलासराव देशमुख, संदीप देशमुख, जाधव, वऱ्हाडे, मते, गणेश वाघमारे, नानाभाऊ उगले, धर्मराज बारहाते, प्रल्हाद बिल्हारे, झुंजारराव काकडे, काकासाहेब भडांगे, गणेशराव घुगे, सुभाषराव घारे, वसंतराव कवडे, निर्मला दानवे, सुशीला दानवे, सीमा खोतकर, मनीषा टोपे, संध्या देठे, भुमरे, आशा उगले, पुष्पा तनपुरे, छाया लोमटे, जयश्री परदेशी, नाईकवाडे यांच्यासह सेवेकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

२१ एकरांत होतेय भव्य रुग्णालयाची उभारणी
मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे २१ एकरांमध्ये भव्य व सर्व सुविधांनीयुक्त अशा रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व आजारांवर अल्पदरामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. जनकल्याणाच्या या कामामध्ये प्रत्येकाने आपला खारीचा वाटा घेण्याचे आवाहन करत या रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रत्येकाने जनकल्याण या योजनेमध्ये सहभागी होत मदत करण्याचे आवाहन मोरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...