आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत गुढीपाडव्याचे:आज 200 गृहप्रवेश, हजार वाहने अन‌् दोन किलो सोन्यासह बाजारपेठ ग्राहकांसाठी सज्ज, मात्र महागाईने काहींचा आखडता हात

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त घर, वाहन, सोने-चांदी खरेदीसाठीची रेलचेल वाढली असून शनिवारी २०० कुटुंबांचा गृहप्रवेश व तितकेच बुकिंग, १००० दुचाकी-चारचाकी अन् दोन किलाे सोने विक्री होईल. इंधन दरासह सर्वच क्षेत्रांत वाढलेली महागाई, गत आर्थिक वर्षाचा शेवट व नवीन वर्षाच्या प्रारंभामुळे जमा-खर्चाची जुळवाजुळव केल्याने हाती शिल्लक पैसे नसणे, यातच शनिवार, रविवार सुटी आदी कारणांमुळे सध्या ग्राहकी कमी असली तरी कोरोना नियंत्रणात आल्याने अर्थचक्र पूर्वपदावर येईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून स्टील, सिमेंटसह बांधकाम साहित्य व मजुरीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे गृहप्रकल्प असो की वाणिज्यिक प्रकल्पाची किंमत वाढून त्याचा बोजा ग्राहकावर पडेल, असे सांगितले जात होते. तर, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात आणखी भाववाढीची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे ३१ मार्च २०२२ पूर्वी बुकिंग केल्यास कमी किमतीत घर, फ्लॅट, रो-हाऊसेस, बंगलोज मिळू शकतात, अशा ऑफर्स काही बांधकाम व्यावसायिकांकडून दिल्या गेल्या होत्या. शिवाय, नवीन वर्षात रेडीरेकनरचे दर वाढण्याची शक्यता होती. यामुळे अनेकांनी गतवर्षातच बुकिंग केले होते, यामुळे गुढीपाढव्याला जुन्या किमतीत घर खरेदी करून गृहप्रवेशाची संधी त्यांना मिळाली. काही जण किमतीपेक्षा मुहूर्ताला महत्त्व देणारे असल्याने त्यांनाही याच दिवशी गृहप्रवेश करता येणार आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी जुन्या दरात बांधकाम साहित्य खरेदी केलेले असल्याने त्यांनीही दरात फारशी वाढ न करता इच्छुकांच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावला आहे. यामुळे गत आर्थिक वर्षात बुकिंग केलेले व ऐन २ एप्रिल रोजी बुकिंग करणारे दोघेही स्वस्तात घर खरेदी करू शकणार आहेत.

२ एप्रिल रोजी बुकिंग करणारे स्वस्तात घर खरेदी करू शकणार

वाहने महागली तरी खरेदी कायम
एसटी सहा महिन्यांपासून बंद आहे तसेच खासगी प्रवासभाड्यातही भरमसाट वाढ झालेली आहे. यामुळे स्वत:चे हक्काचे वाहन असावे म्हणून दुचाकी तर काहींनी चारचाकी घेण्याला प्राधान्य दिले. तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागतो, यातून वेळही वाचतो म्हणून वाहन घेण्याकडे कल वाढला. यामुळे चार दिवसांपासून विविध वाहनांच्या शोरूममध्ये विचारपूस, बुकिंग व खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

दागिने खरेदीसाठी रेलचेल
गुढीपाडव्याला सोने-चांदी, दागिने खरेदी शुभ मानली जात असल्यामुळे सराफ्यात दोन किलोहून अधिक सोने विक्री होऊ शकेल, त्याचप्रमाणे चांदीचीही विक्री होईल. वाढत्या महागाईमुळे अनेकांनी दैनंदिन गरजांवर लक्ष केंद्रित केले असले तरी मुहूर्तावर खरेदीचा ओढा कायम आहे.

सध्या तुरळक ग्राहकी, लग्नसराई धूमधडाक्यात
कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध, इंधन दरवाढ व परिणामी सर्वच क्षेत्रांतील महागाईमुळे सोने-चांदी खरेदीकडे कल कमी आहे. शुक्रवारी सोने ५२ हजार ५०० रुपये प्रतितोळा तर चांदी ७० हजार रुपये किलो होती. येणाऱ्या लग्नसराईत लोक धूमधडाक्यात दागिने खरेदी करतील, यामुळे आशावादी आहोत. - भरत जैन, सराफा व्यापारी, जालना

किंमतवाढीमुळे खरेदी कमी, चित्र बदलेल
वाहनांच्या किमती वाढल्या. यामुळे तुलनेने ग्राहकी कमी आहे. मात्र, वाढती गरज लक्षात घेऊन लोक वाहन खरेदी करत आहेत. ३१ मार्चपूर्वी ज्यांनी दुचाकी घेतली त्यांना १ एप्रिलच्या किमतीपेक्षा एक हजार ते १५०० रुपयांचा फायदा झाला. येणाऱ्या काळात वाहन विक्री वाढेल.- सचिन शहा, दुचाकी विक्रेते, जालना

तयार घरेच कमी किमतीत मिळतील
बांधकाम साहित्य, मजुरी, रेडीरेकनर दरवाढ, शासनाकडून सबसिडी बंद झाल्यामुळे घरांच्या किमती वाढणार आहेत. प्रति चौरस मीटर ५०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे जी तयार घरे आहेत, तीच कमी किमतीत मिळतील. जिल्हाभरात २०० हून अधिक गृहप्रवेश होतील, तितकेच बुकिंगही होईल.
- अविनाश भोसले, सचिव, क्रेडाई, जालना.

मार्च एंड अन् महागाईमुळे तुरळक व्यवहार
मुहूर्तावर वाहन किंवा घर खरेदीकडे अनेकांचा कल आहे. मात्र, नुकताच झालेला मार्च एंड असो की वाढती महागाई, याचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला. इंधन, बांधकाम साहित्याची दरवाढ, मजुरांची समस्या ही आव्हाने विकासकांसमोर आहेत. सध्या व्यवहार तुरळक असले तरी येणाऱ्या काळात ते पूर्ववत होतील. - राजेश खिस्ते, बाजारपेठ विश्लेषक, जालना

मार्च एंड अन् महागाईमुळे तुरळक व्यवहार
मुहूर्तावर वाहन किंवा घर खरेदीकडे अनेकांचा कल आहे. मात्र, नुकताच झालेला मार्च एंड असो की वाढती महागाई, याचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला. इंधन, बांधकाम साहित्याची दरवाढ, मजुरांची समस्या ही आव्हाने विकासकांसमोर आहेत. सध्या व्यवहार तुरळक असले तरी येणाऱ्या काळात ते पूर्ववत होतील. - राजेश खिस्ते, बाजारपेठ विश्लेषक, जालना

बातम्या आणखी आहेत...