आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजची शिक्षण पद्धती ही थेरी कडून प्रॅक्टिकल जाते, हेच गणित चुकीचे आहे, प्रत्यक्षात प्रॅक्टिकल कडून थेरीकडे गेलो तरच आजचे शिक्षण हे रोजगारक्षम असेल. त्यामुळे वाढत्या तरुणांच्या संख्येमध्ये शिक्षणाने कौशल्य निर्माण केले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. संजय मून यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय विद्यार्थी समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मिलींद पंडित होते. संयोजक प्रोफेसर डॉ. दादासाहेब गजहंस यांनी कार्यशाळेच्या आयोजना संदर्भातील भूमिका मांडली. डॉ. मून म्हणाले, आजची परीक्षा पद्धती ही सेमिस्टर पद्धती असून शिक्षक हा कारकुनी होत चाललेला आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.
शिक्षण प्रक्रियेत आपण का सहभागी झालो? याचा विचार आपण स्वतः करावा. बालपणी शिक्षण कसे होते, आम्ही स्वतः शाळेत गेलो नाही, स्व: इच्छेने सहभागी झालो नाही. आजची पिढी मात्र भिन्न आहे. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षणाकडे आलेली आहे. त्यामुळे आजच्या वाढत्या तरुणांच्या संख्येमध्ये रोजगारक्षम शिक्षण असणे गरजेचे आहे. आजचे शिक्षण जर रोजगारक्षम झाले नाही तर भविष्यामध्ये विद्यार्थी हा ग्राहक तक्रार निवारण केन्द्राकडे तक्रार करेल अशी परिस्थिती पाच सात वर्षात येऊ शकते.
जागतिक स्तरावर लोकसंख्येची समस्या, विकसित राष्ट्रांमध्ये वृध्दांची असणारी संख्या आणि भारतामध्ये असणारी तरुणांची संख्या याचा विचार करता भारत हा महासत्ता होण्यासाठी आपल्याला आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पंडीत यांनी तरूणांनी आशावादी राहून आपल्या प्रगतीसाठी संधीचा शोध घेतला पाहिजे. असे सांगितले. प्रारंभी अल्मास शेख हिने स्वागत गीत सादर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.