आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:घाेषणांचा पाऊस, अतिवृष्टीग्रस्त काेरडे

बाबासाहेब डोंगरे | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीसह पुराने केलेला कहर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेला. याला दोन-तीन महिने उलटून गेले तरीही बाधित शेतकऱ्यांना मदतीचा छदामही मिळालेला नाही. राज्य शासनाकडून १७ नोव्हेंबर २०२२ रोजी जालना जिल्ह्यासाठी ३९७ कोटी ७३ लाख १४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बँक खाते क्रमांकासह बाधितांच्या याद्याही तयार झाल्या, मात्र प्रत्यक्षात निधी आला नाही.

जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्यामुळे हंगामी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. शेतजमिनी खरडल्यामुळे हंगामात पेरणी, लागवड कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. खरिपात काहीही हाती न आल्याने रब्बीच्या आशेने पुन्हा उसनवारी केली. आता पिकेही वाढीस लागली. मात्र खते, औषधीसाठी पैसे नसल्यामुळे ही कामे रखडली.

हिवाळी अधिवेशनावरच भिस्त
केंद्रच्या आखत्यारित एनडीआरएफकडून अतिवृष्टी बाधितांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळते. जिरायतीला प्रतिहेक्टर ६८००, बागायतीला १३५०० तर बहुवार्षिक पिकांना १८००० हजार हा दर आहे, प्रत्यक्षात यात राज्याने अनुक्रमे १३६००, २७००० व ३६००० पर्यंत वाढ करत ३ हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवली. तसेच अतिवृष्टीबरोबरच पावसाच्या नुकसानीचाही समावेश केला. याला मंत्रिमंडळ उपसमितीच्या संमतीने निधी वितरणाचा जीआर १७ नोव्हेंबर २०२२ रोजी िनघाला. मात्र, अजूनही बीडीएसवर रक्कम आली नाही. दरम्यान, निकषात बदल व अनुदानात वाढ केल्यानुसार त्या-त्या लेखाशीर्षनिहाय रक्कम वर्ग करावी लागत असल्याने निधी वितरणास विलंब होत आहे. हिवाळी अधिवेशानात पुरवणी मागणीद्वारे निधीची आवश्यक तरतूद करून हा निधी विभागीय आयुक्तांना कार्यासन यांनी वितरीत करावा, असे जीआरमध्ये म्हटल्यामुळेसुद्धा विलंब होत असावा, असेही सूत्रांनी सांगितले.

बाधितांना वाढीव मदतीचा दावा
ज्या मंडळात २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस व ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना वाढीव दराने मदतीची घोषणा करत शासनाने ३९७ कोटी ७३ लाख १४ हजार रुपये मंजूर केले. यानुसार त्या-त्या तहसीलदारांना निधी वितरणाचा आदेशही निघाला. यात सर्वाधिक ८७ हजार ९०४ बाधित शेतकरी अंबड तालुक्यातील असल्यामुळे त्यांना ११२ कोटी ६३ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महिना होत आला तरिही शेतकरी अनुदानापासून वंचितच आहेत.

अंत पाहू नका, तत्काळ मदत द्या
अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठीची मदतीचा घोषणा हवेतच विरली असून ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. दोन-महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. शासनाने आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ मदत द्यावी तरच काहीसा दिलासा मिळेल.- माधव पवार, शेतकरी, सामनगाव, ता. जि. जालना

अनुदान मंजूर, बीडीएसवर पैसे नाही
शासनाकडून बाधित शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले असून नुकसानीच्या अंतिम अहवालाआधारे बँक खाते क्रमांकासह याद्या तयार करण्यात आल्या आहेत. अद्याप बीडीएसवर रक्कम आलेली नाही, निधी मिळताच वितरीत केला जाईल.- केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना

बातम्या आणखी आहेत...