आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची पायमल्ली:परतुरात होतेय जैव वैद्यकीय कचऱ्याची नगर परिषदेच्या घंटागाडीतून वाहतूक

परतूर6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • संसर्गजन्य आजारांना फैलाव होण्यास कारणीभूत ठरणारा प्रकार

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पुरते नाहीसे झालेले नसताना, कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांना फैलाव होण्यास कारणीभूत ठरणारा धक्कादायक प्रकार परतूर शहरात घडला. शहरातील काही खासगी हॉस्पिटल्समधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआमपणे उघड्यावरून तेही नगर परिषदेच्या घंटागाडीतून वाहून नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर रजिस्ट्री कार्यालयाजवळ नव्यानेच सुरू झालेल्या एका खासगी हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला. सदरील प्रकरणानानंतर संबंधित हॉस्पिटल प्रशासन व नगर परिषद प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार दवाखाने, नर्सिंग होम्स यांमधून दररोज निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची साठवणूक, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्याची विशिष्ट पद्धती विहित करण्यात आली आहे. ज्या वैद्यकीय आस्थापनांमधून जैव वैद्यकीय कचरा निर्माण होणार आहे अशा सर्व आस्थापनांनी संबंधित यंत्रणेकडून विहित नमुन्यात परवाना घेणे आणि वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील काही वैद्यकीय अस्थापनांकडे याबाबतचा परवानाच नाही तर काहींच्या परवान्याचे नूतनीकरनच करण्यात आलेले नाही. निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कोणालाही देता येत नाही, यासाठी संबंधित व्हेंडरकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना असणे बंधनकारक आहे.

नोंदणीकृत व्हेंडरकडे वैद्यकीय कचरा देताना याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेला कचरा तात्पुरता साठवण्यासाठी वेगळी जागा असणे आवश्यक आहे. जी सर्वसामान्य रुग्ण आणि नातेवाईक यांचा संपर्क येणार नाही एवढी लांब असावी. शहरातील काही हॉस्पिटल्समध्ये जनरल वार्डमध्येच उघड्यावरच हा कचरा दोन-दोन दिवस पडून असतो. ज्या माध्यमातून संसर्गाची शक्यता अधिक बळावते. नियमानुसार खुला वैद्यकीय कचरा साठवता येत नाही किंवा वाहतूक करता येत नाही. या संबंधीचा असणारा नियम धाब्यावर बसवून शुक्रवारी संपूर्ण जैव वैद्यकीय कचऱ्याने भरलेली घंटागाडी या हॉस्पिटल समोर आढळून आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा संपूर्ण कचरा एका हॉस्पिटलचा नसून इतरही काही हॉस्पिटल्समधून गोळा करण्यात आलेला होता. दरम्यान, शहरातील कचरा वाहून नेण्याचे नगर परिषदेचे कंत्राट असणाऱ्या कंत्राटदारामार्फत हा कचरा गोळा केला जात होता. वैद्यकीय कचरा गोळा करण्याचा, वाहतुकीचा अथवा विल्हेवाट लावण्याचा परवाना नसताना हा वैद्यकीय कचरा संबंधित कंत्राटदाराने का गोळा केला, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

कारवाईचे अधिकार स्थानिक प्रशासनाला
जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार कुठल्याही वैद्यकीय अस्थापनांना जैव वैद्यकीय कचरा खुला साठवता येत नाही किंवा खुल्या पद्धतीने विल्हेवाट लावता येत नाही. सदरील नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व शासकीय आणि खासगी हॉस्पिटल्सना बंधनकारक आहे. नियमांचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. - डॉ. डी. आर. नवल, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, परतूर

जैव वैद्यकीय कचरा सर्वसामान्य घंटागाडीत वाहतूक करता येत नाही, सदरील कृती नियमाच्या विरुद्ध असल्याने संबंधित हॉस्पिटलला २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तो वसूलही करण्यात आला आहे. - रवी देशपांडे, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, परतूर

बातम्या आणखी आहेत...