आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांची चोरी:दोन चोरटे ताब्यात; सिल्लोडचे 13 जण रडारवर

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून कारमधून जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जनावरांची कत्तल करून विक्री करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन कारसह जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जनावरे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत असताना सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन गायी सिल्लोड येथील टोळीने चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे एक पथक सिल्लोड येथे गेले. तिथे जनावरे चोरी करणाऱ्यांचा शोध घेतला असता संशयित जुनेद ताहेर कुरेशी (२५, स्नेहनगर, सिल्लोड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने सोबतच्या इतर १३ साथीदारांच्या मदतीने कारमधून जनावरांची चोरी केल्याचे सांगितले. जनावरे सिल्लोड येथील शेख मेहबूब सुबराती (२५ ईदगाहनगर, सिल्लोड) याला विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब सुबराती यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जुनेद कुरेशी व साथीदारांनी चोरी केलेली जनावरे विकत घेऊन त्यांचे मांस विक्री केल्याचे सांगितले.

पोलिसांनी जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड, सुरा, लोखंडी रॉड आदी साहित्य जप्त केले. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुभाष भुजंग, पीएसआय प्रमोद बोंडले, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, भावराव गायके, जगदीश बावे, रुस्तुम जैवाळ, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिव चौधरी, रवी जाधव, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, सूरज साठे, चंद्रकला शडमल्लू यांनी ही कारवाई केली. या आरोपींनी चाळीसगाव, अजिंठा, सिल्लोड, परतूर, मौजपुरी, भोकरदन येथून जनावरे चोरली आहेत.

बातम्या आणखी आहेत...