आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:चिन्ह वाटपास मिळाली दोन दिवसांची मुदत

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या २६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुकांना नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी तसेच चिन्ह वाटपासाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यामुळे बुधवार व गुरुवारी दोन्ही दिवस तहसिल कार्यालयांमध्ये गर्दी होती. यात काही पॅनल प्रमुख अर्ज कायम ठेवण्यासाठी तर काही जण माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करताना दिसले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सुरूवात झाली. पुढे २९, ३० नोव्हेंबर तसेच १ व २ डिसेंबरपर्यंत सरपंच पदासाठी १४०६ तर सदस्यत्वासाठी ६३३१ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. यात ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे भरताना काहींना अडचणी येत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष तहसिल कार्यालयात अर्ज स्विकारण्याची मागणी इच्छुकांकडून करण्यात आली.

याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी २ डिसेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यास मुभा दिली. शिवाय सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली. यामुळे इच्छुकांची संख्या वाढली. यात अनेकांनी एकापेक्षा अधिक वार्डात अर्ज भरले, तर काहींनी एकाच कुटुंबातून दोन जणांचे अर्ज भरले. काेणत्याही कारणास्तव अर्ज बाद होऊ नये याची काळजी घेत उमेदवारांनी सतर्कता दर्शवली. यामुळे सर्वच तहसिल कार्यालयांमध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत इच्छुक उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी लांबच-लांब रांगा होत्या. मात्र, बुधवार व गुरुवार नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी अनेकांनी तहसिल कार्यालय गाठले.

५४ अर्ज अवैध, ७६६३ वैध
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अर्ज छाननीत एकूण ७ हजार ७१७ पैकी ५४ अर्ज अवैध ठरले असून वैध अर्जांची संख्या ७ हजार ६६३ एवढी आहे. यात सरपंच पदासाठी १३९५ तर सदस्यत्वासाठी ६२२८ अर्ज वैध असून यातून माघार कितीजण घेतात यावर अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...