आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्यिकांना राज्यकर्त्यांचे कान धरण्याचा अधिकार आहे. त्यांनी कुणाचीही भीडभाड न बाळगता राजकारण्यांचे दोष दाखवून द्यायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज उद्धव ठाकरेंनी केले. घनसावंगी येथे हे संमेलन होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
राजा तु चुकतोय
उद्धव ठाकरे म्हणाले, राजा तु चुकतोय, असे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांना आहे. कारण राजाच्या चुकीमुळे नुकसान राजाचे नव्हे तर राज्याचे होणार आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांना खडसावण्याच काम साहित्यिकांनी कोणतीही भीडभाड न बाळगता केली पाहीजे. तसेच, साहित्यिकांनी देश आणि देशाच्या दशेवर केवळ परिसंवाद घेऊ नयेत. वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरावे. केवळ परिसंवादाने काही होत नाही, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
विव्हळणारा मराठवाडा शोभणारा नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, हिटलरने विरोधकांचा अनन्वित छळ केला. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. हिटलरविरोधात कुणी बोलत नव्हते. आज मात्र आपल्या देशात लोकशाही आहे. सत्तेविरोधात बोलले तर तुरुंगात जाण्याची भीती साहित्यिकांना नसावी. तसे आश्वासन दिले गेले पाहीजे. मराठवाडा ही रझाकारांशी लढलेली भूमी आहे. विव्हळणारा मराठवाडा विरांना शोभणारा नाही. जेव्हा जेव्हा समाजावर नैराश्याचे ढग येतील तेव्हा तेव्हा आशेचे स्वप्न दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केलेच पाहीजे.
आजचे रेडे वेगळे
उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे गटावरही खोचक टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, बरे झाले ज्ञानेश्वर आताच्या काळात नाही. कारण ज्ञानेश्वरांनी त्या काळात रेड्याच्या तोंडून वेद वदवले, असे म्हटले जाते. मात्र, आजचे रेडे वेगळेच आहेत. ज्ञानेश्वरांनी वेद सांगितले असते तरी ते खोके-खोकेच बोलले असते.
ही लोकशाही आहे का?
पूर्वग्रहदूषित मत न व्यक्त करता वातावरण प्रदुषमुक्त होण्यासाठी साहित्यिकांनी समाजातील कठीण विषयांवर बोलायला हवे. आपल्या देशात अजूनही लोकशाही रुजली की नाही, याचा विचार व्हायला हवा. कारण आज आपण ज्यांना मते देतो, त्यांची किंमत खोक्यात नव्हे तर भावनेत व्हायला हवी. आज खरेतर गुप्त मतदान आहे. आपण कुणाला मत दिले हे इतरांना समजू नये. म्हणून ही पद्धत आहे. पण, आज मतदारांनाही आपले मत कुठे जाते, हे कळेनासे झाले आहे. त्यांची मत सुरतहून आसाम, गुवाहाटी नंतर गोवा अशी फिरत आहे. त्यामुळे आपल्या मताची किंमत काय? आपण एखाद्याला भावनेने मत देतो. मात्र, नंतर त्या उमेदवाराच्या घरी खोका पाठवून त्याला खोक्यात बसवून इतरत्र नेले जाते आणि आपण बोंबलत बसतो, अशी व्यवस्था आपल्याला हवी आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गासाठी नागपुरात येत आहे. त्यावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतील आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतील. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून आम्हालाही टोमणे मारतील. मात्र, कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांवर जो अत्याचार करत आहे, त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना खडसावलं पाहीजे. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार असणार नाही.
तसेच, कोश्यारींना मी राज्यपाल कोश्यारी मी म्हणत नाही. कारण ते त्या पात्रतेचे नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.