आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतीच्या वादातून भावासह पुतण्यांनी दुचाकी अडवून वृद्ध चुलत्यावर तलवार, काठीने वार करून हत्या केली. यानंतर त्यांच्याजवळील दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना बदनापूर तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. रतन गिरजाजी खंडाळे (६५) असे मृताचे नाव आहे. यात चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील शेतकरी रतन गिरजाजी खंडाळे (६५) आणि त्यांच्या पुतण्यामध्ये शेतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रतन खंडाळे हे शेतातून बकऱ्या विकून गावातील पाटलाचे घेतलेले उसने पैसे देण्यासाठी येत होते. दरम्यान, त्यांची दुचाकी अडवून शेतीच्या हिश्श्याच्या वाटणीवरून व जुन्या भांडणाच्या कारणावरून राग मनात धरून तलवार, कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात काठीचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मारहाण करून त्यांच्याजवळील दीड लाख रुपये लंपास केले. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गौतम रतनराव खंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्र्यंबक गिरजाजी खंडाळे, रवी त्र्यंबक खंडाळे, गणेश त्र्यंबक खंडाळे, सतीश त्र्यंबक खंडाळे, संदीप उत्तम खंडाळे (मांडवा, ता. बदनापूर) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन खंडाळे यांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी टाहो फोडला.
चौघांना अटक
या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, अनिल चव्हाण, हवालदार बीट जमादार वाघमारे, परमेश्वर हिवाळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून चार आरोपींना अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.