आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यात गोदापट्ट्यातील अनेक गावातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय झाले असून वाहन घसरत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पाणी साचत असल्याने खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटेमोठे अपघात घडत आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे नव्याने काम झालेले आहे. त्या रस्त्याच्या डांबरीकरनानंतर सिलकोटचे काम न केल्याने तसेच साईड पंख्यात संबंधित कंत्राटदारांकडून मुरूम न टाकल्याने नवे रस्ते खराब होण्याचे प्रकारही झाले आहेत. जी.प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामावर येत नसल्यामुळे कंत्राटदार मनमानीपणे थातुरमातुर काम करून काम पूर्ण करत असल्याचे आरोप ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत असून याकडे सम्बधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील कंडारी गावात जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे व चिखलामुळे एसटी महमंडळाची बस गावात न येता फाट्यावरून जात असल्याने शाळेतील मुलां - मुलींना दीड किमी. पायपीट करण्याची वेळ आली आहे. तसेच गोदापट्यातील काही गावात अप्रोच रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झालेले असून त्या रस्त्यावर डांबराचा सिलकोट केलेला नसल्याचे आढळून येत असून. सिलकोट न केल्याने रस्ता लवकरच खराब होऊन जैसे थे परिस्थिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून जी.प. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाक भूमिकेमुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एक महिण्यापूर्वी घनसावंगी येथे झालेल्या एका कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी तालुक्यातील नव्याने होत असलेल्या ठिकठिकाणच्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्याने रस्त्याच्या कामाचे थर्डपार्टी इंस्पेक्षण झाल्याशिवाय त्या कामाचे बिल अदा करू नये त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ थर्डपार्टी समिती नेमण्याचे कार्यक्रमात जाहीर सूचित केले होते. दरम्यान बहुतांश कंत्राटदार हे राजकीय हितसंबंधी असल्याने आमदार राजेश टोपे यांच्या सुचनेकडे किती गांभीर्याने बघितल्या जाईल याविषयी उलटसुलट चर्चा व्यक्त होत आहे.
आता आमदार टोपे मंत्रीपदावर नसल्याने त्यांच्या सुचनेचे जिल्हाधिकारी पालन करतात का. ही पण शंका सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. मात्र, नागरिकांच्या सूविधेसाठी अडचणी ठरणाऱ्या या विकासत्मक बाबींकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मुरमा ते भोगगाव जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या ४ किमी रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झाले होते. त्यावर सीलकोट न केल्याने तसेच साईड पंखे न भरल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच बानेगाव फाटा ते गावापर्यंत अप्रोच रस्त्याचे देखील सिलकोटचे काम झाले नसल्याने जी.प.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ राहिलेले काम पूर्ण करावे नसता आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे पुरुषोत्तम उढाण यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.