आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Vineyards In Kadwanchi, Nandapur, Dharkalyan Horizontal Due To Heavy Rains; Farmers Are Worried About The Loss Of Crops On Three And A Half Hundred Hectares News And Updates

जालना:पाऊस अन् गारपिटीने कडवंची, नंदापूर, धारकल्याणमध्ये द्राक्षबागा आडव्या; शेतकरी हवालदिल, साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना तालुक्यातील कडवंची शिवारात द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहणी करताना तलाठी भास्कर मोरे व अन्य.

तालुक्यातील कडवंची, धारकल्याण, नंदापूर, वरुड, नाव्हा शिवारात बुधवारी रात्री १० वाजेदरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीने द्राक्षबागा आडव्या झाल्या तर गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिकांची नासाडी झाली. एकीकडे काेरोनामुळे बाजार बंद असल्याने द्राक्षांची बेभाव विक्री करावी लागत आहे. यातच आलेल्या या अस्मानी संकटाने हाताताेंडाशी आलेला घासही हिरावून गेला असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साधारणत: साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून याचा अहवाल शुक्रवारी वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेहमीप्रमाणे तलाठी, कृषी सहायकांनी गुरुवारी शिवारात पाहणी करून नुकसानीच्या नोंदी घेत सरकारी सोपस्कार पूर्ण केले. या वेळी शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसह इतर रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरक्ष: पाणी आले होते. काल-परवापर्यंत द्राक्षांनी लगडलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याचे पाहताना शेतकरी नि:शब्द होत. अगदी पोटच्या लेकराप्रमाणे दिवस-रात्र घाम गाळून जगवलेल्या या बागांची अवस्था बघून काहींच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. मात्र, हे संकट असून यातून आपण मार्ग काढू असे म्हणत शेतकरी एकमेकांना धीर देत एकेक पाऊल पुढे टाकत होते.

स्वत:च उभ्या कराव्या लागतील बागा : नुकसानीचा अहवाल सरकार दरबारी जाईल मात्र पूर्वानुभव लक्षात घेता मदत कधी मिळेल हे निश्चित नाही. यामुळे शेतकऱ्यांनाच पदरमोड करूनच बागा पुन्हा उभ्या कराव्या लागणार असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठीही काहींना उसनवारी तर काहींना बँक किंवा खासगी सावकाराकडे कर्जासाठी खेटे घालावे लागणार आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अतिवृष्टी, पूर, गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले.

पिकांच्या नुकसानीची माहिती मागवली
जालना तालुक्यातील गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बुधवारी रात्री झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठ्यांना पाठवले होते, त्यांच्याकडून सविस्तर माहिती मागवली आहे. - श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना.

बातम्या आणखी आहेत...